नंदुरबार येथील बी.ए.पी.एस. स्वामिनारायण मंदिरात रविवारी अन्नकूट महोत्सव भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा झाला. भाविकांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. सनातन हिंदू धर्माच्या उत्सव परंपरेत दिवाळीच्या काळात इष्टदेवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अन्न-धान्याचा पहिला नैवेद्य म्हणून अन्नकूट अर्पण करण्याची परंपरा आहे.
या कार्यक्रमासाठी ज्ञानचिंतन स्वामी आणि पवित्रमूर्ती स्वामी हे संत प्रमुख उपस्थित होते. श्रद्धा, समर्पण आणि भक्तीद्वारे भगवंताला आणि सत्पुरुषाला कसे प्रसन्न करावे, याबाबत त्यांनी भाविकांना मार्गदर्शन केले. याआधी धुळे येथून आलेल्या स्वामींचे प्रवचन झाले.
२५१ प्रकारचे नैवेद्य आणि ५६ भोग
महोत्सवात भगवंताला अर्पण करण्यात आलेला अन्नकूट भाविकांचे आकर्षण ठरला. हरिभक्तांनी अत्यंत भक्तिभावाने विविध नैवेद्याचे पदार्थ आपल्या घरून स्वतः तयार करून आणले होते. या वेळी देवाला सुमारे २५० विविध पदार्थांचा नैवेद्य दाखविण्यात आला. सकाळी भाविकांसाठी अन्नकूट दर्शन आयोजित करण्यात आले होते.
दर्शनानंतर दुपारी उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. अन्नकूट महोत्सवात एकूण २५१ प्रकारचे व्यंजन नैवेद्य म्हणून दाखविण्यात आले. त्यात विविध प्रकारचे फरसाण, मिठाई आणि अन्य पदार्थ होते. त्यानंतर ५६ भोग लावण्यात आले. हे भोग कांदा आणि लसूणविरहित पदार्थांचे होते. या वेळी महाआरतीही करण्यात आली.
Leave a Reply