धुळे जिल्ह्यात शाळा सुरू होऊन पाच महिने उलटले, दिवाळीची सुटीही संपत आली, तरी विद्यार्थ्यांना दप्तर मात्र अजून मिळालेले नाही. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती गणवेश आणि पाठ्यपुस्तके पडावीत, यासाठी शिक्षण विभागाने यंदा विशेष नियोजन केले होते. समग्र शिक्षा अभियानांतर्गत करण्यात आलेल्या नियोजनामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना एक जोड गणवेश आणि पाठ्यपुस्तके मिळाली होती. आता दुसऱ्या सत्रात दुसरा गणवेश आणि बूट-मोजे मिळणार असले, तरी दप्तराची प्रतीक्षा कायम आहे.
विद्यार्थ्यांसाठी बूट-मोज्यांसाठी शासनाकडून अनुदान मिळाले आहे. प्रतिविद्यार्थी १७० रुपये अनुदान प्राप्त झाले असून, या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक जोड बूट आणि दोन जोडी मोजे मिळणार आहेत. तसेच दुसरा गणवेश म्हणून स्काउट व गाइडचा गणवेशही विद्यार्थ्यांच्या हाती पडणार आहे. दुसऱ्या सत्राच्या पहिल्याच दिवशी दिवाळी सुटीनंतर हा दुसरा गणवेश विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
स्काउटचा आकर्षक पोशाख
दुसरा गणवेश स्काउट व गाइडचा असून, त्यामध्ये मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळी हाफ पँट, तर मुलींसाठी आकाशी शर्ट व गडद निळा स्कर्ट असलेला पिनो फ्रॉक किंवा गडद निळी सलवार व आकाशी कमीज असा आकर्षक पोशाख निश्चित केला आहे. दुसऱ्या गणवेशाचे पैसे प्राप्त झाल्याने दिवाळी सुटीनंतर दुसऱ्या सत्राच्या पहिल्याच दिवशी हा पोशाख विद्यार्थ्यांच्या हाती पडणार आहे.
दप्तर वाटप रखडले; पालकांमध्ये नाराजी
दुसऱ्या गणवेशाचा आणि बूट-मोज्यांचा प्रश्न मार्गी लागला असला, तरी दप्तराचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. शैक्षणिक वर्षाचा निम्मा कालावधी संपत आला तरी दप्तर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेले नाही. दप्तर वाटपासाठी शासनाकडून अद्याप निधी उपलब्ध झालेला नसल्याने शिक्षण विभागालाही पुढील प्रक्रिया करता आलेली नाही. निधी वितरणातील या विलंबाचा फटका विद्यार्थ्यांना बसत असून, पालकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
महागाईच्या काळात मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवणे सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. विशेषतः मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या पालकांना शैक्षणिक साहित्याच्या खर्चाची मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य मोफत उपलब्ध करून देण्याची योजना राबवली जाते. धुळे जिल्ह्यातील एक हजार १११ नियमित आणि आठ पीएमश्री शाळांमधील एकूण ८० हजार ८३५ विद्यार्थ्यांना पहिला गणवेश मिळाला आहे. आता या सर्व विद्यार्थ्यांच्या हाती दुसरा गणवेश आणि बूट-मोजेही पडणार आहेत. यात साक्री तालुक्यातील ४४२ शाळांमधील २५ हजार ७४४, शिरपूर तालुक्यातील २७८ शाळांमधील २२ हजार ९२, धुळे तालुक्यातील २२४ शाळांमधील २१ हजार ६६२, तर शिंदखेडा तालुक्यातील १७५ शाळांमधील ११ हजार ३३७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
Leave a Reply