दिवाळीचा आनंद लुटत असताना धाराशिव शहर आणि परिसरात मात्र आगीच्या घटनांचे सत्र सुरू होते. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे ८ ते १४ नोव्हेंबर या सात दिवसांत शहर आणि परिसरात आगीच्या तब्बल १८ घटना घडल्या. शहरवासीय सण साजरा करत असताना अग्निशमन दलाचे जवान दिवस-रात्र आगी विझवण्याच्या कामात गुंतले होते. बहुतांश आगी फटाक्यांमुळेच लागल्याचे सांगण्यात आले.
कमी मनुष्यबळ, मोठी जबाबदारी
धाराशिव अग्निशमन विभागात अवघे १२ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात आठ अग्निशमन कर्मचारी आणि चार वाहनचालकांचा समावेश आहे. साधनांच्या बाबतीत विभागाकडे एक अग्निशमन बंब, एक छोटे बचाव वाहन आणि नुकताच दाखल झालेला एक तात्पुरता बंब अशी मर्यादित साधने आहेत. या साधनांच्या मदतीने जवानांनी दिवाळीच्या काळात दिवस-रात्र काम करीत नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडली. त्यांच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठे नुकसान टळले.
सात दिवसांचा घटनाक्रम
८ नोव्हेंबरला शेकापूर येथे सोयाबीनच्या भुस्कटाला, कौडगाव एमआयडीसीत सौरऊर्जा प्रकल्पाजवळ आणि शहरातील पुष्पक मंगल कार्यालयाजवळ कचऱ्याला आग लागली. ९ नोव्हेंबरला बार्शी नाका परिसरात लाकडे व कचरा, येडशी येथे किराणा दुकान, कौडगाव एमआयडीसी आणि तुळजापूर येथे मंडपाच्या गोदामाला आग लागली. १० नोव्हेंबरला आयुर्वेदिक महाविद्यालय परिसर, शांतिनिकेतन कॉलनीतील शाळा परिसर, गणेशनगर, टीपीएस स्कूल परिसरातील जंगल आणि तुळजापूर येथील भैरवनाथ मंदिराजवळील वाहनतळ तसेच नाज रेस्टॉरंट परिसरात आगीच्या घटना घडल्या.
११ नोव्हेंबरला समतानगरमधील रुग्णालय परिसरात गवताला, तर राघुचीवाडी येथे नारळाच्या झाडाला आग लागली. १२ नोव्हेंबरला येडशी येथे गादीच्या दुकानाला भीषण आग लागली, तर तेर येथील गॅरेजमध्ये आग भडकली. १४ नोव्हेंबरला धाराशिव शहरातील वैराग नाका परिसरात गवताला आग लागली. जवानांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
येडशी येथील आगीच्या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अग्निशमन कार्यालयाचे प्रभारी इन्चार्ज संभाजी साळुंके यांनी दिली. अपुरी साधने असतानाही जवान घटनास्थळी पोचून आग आटोक्यात आणण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न करत होते, असे त्यांनी सांगितले. मदतीसाठी येणाऱ्या फोनला एकापाठोपाठ एक प्रतिसाद देत जवानांनी प्रत्येक ठिकाणी धाव घेतली. सात दिवसांत एकाही कर्मचाऱ्याला नीट झोप मिळाली नाही. घरी दिवाळीचा सण असतानाही रात्रंदिवस जागून त्यांनी कर्तव्य बजावले.
Leave a Reply