गोकुळ दूध संघाच्या चेअरमनपदासाठी अखेर निवडणूक प्रक्रिया पार पडली. राज्य सरकारने नियुक्त केलेल्या चार संचालकांनीही या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीत १२ जागांवर समाधान मानावे लागलेल्या महायुतीने १६-१३ अशा फरकाने चेअरमनपदाची निवडणूक जिंकली. महायुतीकडून माजी आमदार राजेश पाटील यांच्या गळ्यात गोकुळच्या अध्यक्षपदाची माळ पडली. मात्र, तत्पूर्वी झालेल्या भाषणातून उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आक्रमक भाषण करत सतेज पाटलांवर जोरदार हल्ला चढवला.
आणीबाणीच्या आठवणी
चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणातून आणीबाणीच्या आठवणी सांगत काँग्रेस आणि बंटी पाटलांवर बोचरी टीका केली. आणीबाणी आणली तुम्ही, २० लाख लोकांना तुरुंगात टाकले तुम्ही. बोलायचे नाही अटक, लिहायचे नाही अटक, मोर्चा काढला अटक. १९ महिने लोक तुरुंगात होते, असे ते म्हणाले.
माझी आधीची बायको विद्या ठाकूर, तेव्हा आठवीमध्ये होती. वडील तुरुंगात, आई जेलमध्ये, भाऊ जेलमध्ये, बहीण जेलमध्ये, एकाच घरातील चार माणसे जेलमध्ये होती. माझी बायको, आठवीची मुलगी तेव्हा जे जे आंदोलनात तुरुंगात गेले होते, त्यांच्या घरी डबा पोहोचवायची, अशी आठवण सांगताना चंद्रकांत पाटील भावुक झाले.
अरे बंटी पाटील, असे हाल केले तुमच्या इंदिरा गांधींनी, माझ्या विद्याच्या घरातली चार माणसे १९ महिने जेलमध्ये होती आणि तू आता आम्हाला लोकशाही शिकवणार, असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी काँग्रेससह बंटी पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला.
महाविकास आघाडीवरही टीका
महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा उल्लेख करतही त्यांनी लोकशाहीवरून पलटवार केला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांवेळी महायुतीचे १६५ निवडून आले, तेव्हा बंटी पाटीलच काँग्रेसचे नेतृत्व करत होते. त्यावेळी तुम्ही जयपूरला जाऊन बसलात, सोनिया गांधींनी दम दिला आणि शिवसेनेला चोरून, लोकांचा जनादेश पायदळी तुडवून सरकार बनवले, असा गौप्यस्फोटही चंद्रकांत पाटील यांनी केला.
जर महाविकास आघाडी म्हणजे बंटी पाटील, तर बंटी पाटील यांच्यासोबत उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी कुठे दिसली नाही, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला. बंटी पाटीलचा स्वभावच आहे, जिथे जाईल तिथे सगळ्यांना पायाखाली घ्यायचे. का तर म्हणे मला केव्हातरी मुख्यमंत्री व्हायचेच. मुख्यमंत्री व्हायचे ते ठीक पण तशी समजही असावी लागते, असा टोलाही चंद्रकांत पाटलांनी बंटी पाटलांना लगावला.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply