बुधवार, ११ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

डोळे वटारले तर साम्राज्य उद्ध्वस्त होईल — चंद्रकांत पाटील

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी महायुतीचे राजेश पाटील निवडून आल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

डोळे वटारले तर साम्राज्य उद्ध्वस्त होईल — चंद्रकांत पाटील

राज्याचे लक्ष लागलेल्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक अखेर पार पडली. न्यायालयाने अंतिम निर्णयासाठी तारीख राखून ठेवली असली तरी अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत महायुतीचे राजेश पाटील हे गोकुळचे अध्यक्ष बनले आहेत. या निकालानंतर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

गोकुळ अध्यक्षपदाची निवडणूक

गोकुळ दूध संघाची कोरमअभावी तहकूब झालेली अध्यक्षपदाच्या निवडसभेची कोंडी पंधरा दिवसांनी फुटली आहे. महायुतीने अखेर अध्यक्षपदावर दावा सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली १० नोव्हेंबर रोजी सभा पार पडली.

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सतेज पाटलांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीकडून शशिकांत पाटील-चुयेकर, तर महायुतीप्रणित छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेश पाटील यांच्यात लढत झाली. या लढतीत राजेश पाटील यांचा विजय झाला. गोकुळच्या निवडून आलेल्या २५ संचालकांनी आणि शासननियुक्त ४ संचालकांनी या मतदानप्रक्रियेत भाग घेतला. निवडणुकीत १२ जागांवर समाधान मानावे लागलेल्या महायुतीने १६-१३ अशा फरकाने चेअरमनपदाची निवडणूक जिंकली.

चंद्रकांत पाटील यांचा इशारा

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोळे वटारले तर तुमचे साम्राज्य एका दिवसात उद्ध्वस्त होईल, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटलांना दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी फक्त शिक्षणमंत्री या नात्याने मला आदेश दिला तर बंटी पाटलांचे काही शिल्लक राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

तुमच्यात धमक असेल तर मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये कामे घेऊन जाऊ नका. जा, राहुल गांधींकडून कामे करून घ्या, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर बोलता आणि कामे करून घेता त्यांच्याकडून, अशी टीका पाटील यांनी सतेज पाटलांवर केली.

स्रोत: मूळ बातमी

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance