शासकीय आरोग्य संस्थांमध्ये महालॅबमार्फत दिल्या जाणाऱ्या मोफत प्रयोगशाळा तपासणी आणि रक्तनमुना संकलन सेवा तातडीने पुन्हा सुरू कराव्यात, अशी मागणी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथील आरोग्य सेवाही त्वरित पूर्ववत कराव्यात, असे त्यांनी म्हटले आहे.
प्रलंबित देयकांमुळे सेवा विस्कळीत
सेवा पुरवठा करणाऱ्या संस्थेची शासनाकडील देयके मागील काही वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी या सेवा विस्कळीत झाल्या असून त्याचा सर्वाधिक फटका गरीब, सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना बसत आहे. विशेषतः नियमित डायलिसिसवर अवलंबून असलेल्या रुग्णांसाठी ही परिस्थिती चिंताजनक आहे, कारण डायलिसिससारख्या जीवनावश्यक उपचारात खंड पडल्यास रुग्णांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो.
शासन आणि सेवा पुरवठादार संस्थेतील आर्थिक वादाचा फटका रुग्णांना बसू नये, अशी भूमिका खासदार वाजे यांनी मांडली आहे. आर्थिक व्यवहारांमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्यसेवेवर परिणाम होणे योग्य नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. डायलिसिससारख्या उपचारात खंड पडणे गंभीर असून गरीब रुग्णांना मोफत व दर्जेदार सुविधा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे, त्यामुळे शासनाने तातडीने हस्तक्षेप करून या सेवा विनाविलंब सुरू कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
खासदारांच्या मागण्या
राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रे आणि डायलिसिस केंद्रांमधील महालॅबच्या सेवा तातडीने सुरू कराव्यात, संबंधित संस्थेची प्रलंबित देयके नियमानुसार अदा करावीत, बंद असलेले आपला दवाखाना केंद्र सुरू करावेत आणि डायलिसिस रुग्णांसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्या खासदार वाजे यांनी केल्या आहेत.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply