उत्तर महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्राला अधिक व्यापक उंचीवर नेण्यासाठी पर्यटनावर आधारित दिवाळी अंकाचे शुक्रवारी प्रकाशन करण्यात आले. नाशिकमधील कालिका प्लाझा येथील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात हा विशेषांक प्रकाशित झाला. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराचा होत असलेला सर्वांगीण विकास आणि जागतिक पातळीवर नाशिकची पर्यटनाच्या दृष्टीने होणारी ओळख या अंकामुळे अधिक दृढ होणार असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
या सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून महापौर हिमगौरी आडके-आहेर उपस्थित होत्या. शब्दमल्हार प्रकाशनचे स्वानंद बेदरकर, ‘तान’चे माजी अध्यक्ष दत्ता भालेराव, वास्तुविशारद शाम लोंढे, आयएमए नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ. विशाल पवार, सामाजिक कार्यकर्ते अजित चव्हाण आदी उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे निवासी संपादक अभय सुपेकर यांनी प्रास्ताविक केले, तर सरव्यवस्थापक संजय पाटील यांनी आभार मानले.
अंकात काय आहे
या विशेषांकात खाद्यसंस्कृती, निसर्गरम्य स्थळे, धार्मिक महत्त्व, ट्रेकिंगचे मार्ग, वाइन पर्यटन आणि चित्रीकरणासाठी उपलब्ध पोषक वातावरण यांसारख्या विविध घटकांना अभ्यासपूर्ण रीतीने अनुभवी लेखकांनी मांडले आहे. कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून होत असलेल्या विकासामुळे आगामी काळात नाशिक पर्यटनाचे केंद्र तयार होत असल्याने विविध अंगाने त्याचा वेध अंकात घेण्यात आला आहे.
मान्यवरांचे मत
शहर व जिल्ह्यात पर्यटनाची क्षमता मोठ्या प्रमाणात असून ती अधिक गतिमान व प्रभावीपणे अधोरेखित होणे गरजेचे असल्याचे मत भालेराव यांनी मांडले. सिंहस्थ कुंभमेळ्याची ओळख केवळ नाशिकपुरती न राहता तो महाराष्ट्राचा कुंभमेळा व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांच्या नावे शहराची ओळख निर्माण होऊन पर्यटनाच्या क्षमतेला चालना मिळावी, असे लोंढे म्हणाले. गेल्या दहा वर्षांत शहराने वैद्यकीय पर्यटनासाठी मोठी भरारी घेतल्याचे डॉ. पवार यांनी नमूद केले. दिवाळी अंकाची परंपरा केवळ महाराष्ट्रात असून ती आजतागायत जपली जात असल्याचे बेदरकर यांनी सांगितले.
सिंहस्थ कुंभमेळ्यात होत असलेल्या कामांचा भाग म्हणून सुरू असलेल्या विकासकामांकडे न पाहता भविष्याच्या दृष्टीने निर्माण होत असलेल्या कायमस्वरूपी सुविधा व शहराच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने बघावे, असे महापौर आडके-आहेर म्हणाल्या. शहर विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे असून, राजकीय सीमांपलीकडे जाऊन केवळ नाशिककर म्हणून एकत्र येण्याची हीच खरी वेळ असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यटन दिवाळी विशेषांक पर्यटनाच्या विकासाला हातभार लावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply