जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेत्र विभागातील अत्याधुनिक सुविधा आणि मॉड्युलर बाल अतिदक्षता विभागाचे लोकार्पण करण्यात आले. या दोन्ही विभागांमुळे जिल्ह्यातील रुग्णांना प्रगत उपचार स्थानिक पातळीवरच मिळणार आहेत.
स्थानिक पातळीवरच मोतीबिंदू शस्त्रक्रिया
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, की नेत्रसेवेच्या आधुनिक सुविधा उपलब्ध झाल्यामुळे उत्कृष्ट, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण मोतीबिंदू शस्त्रक्रिया जळगावातच व्हायला हव्यात. हे रुग्णालय नेत्रोपचार आणि नवदृष्टीचे आदर्श केंद्र म्हणून नावारूपाला यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आधुनिक नेत्रतपासणी आणि शस्त्रक्रियांच्या सुविधा जळगावातच उपलब्ध झाल्यास विशेषतः वृद्ध आणि गरजू रुग्णांना उपचारांसाठी बाहेरगावी जाण्याची गरज भासणार नाही. नेत्र विभाग अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक नियोजन करून प्रस्ताव सादर करावेत आणि त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
गरजू रुग्णांना माणुसकीची वागणूक
मंत्री गिरीश महाजन म्हणाले, की प्रत्येक गरजू रुग्णाला दर्जेदार उपचारांसोबत माणुसकीची वागणूक मिळाली पाहिजे. शासकीय रुग्णालय हे सर्वसामान्यांच्या विश्वासाचे आणि आधाराचे केंद्र बनले पाहिजे. मंत्री संजय सावकारे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून आरोग्यसेवेच्या क्षेत्रात जळगावचे नाव उंचावले जावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
मॉड्युलर बाल अतिदक्षता विभागात एक महिना ते बारा वर्षे वयोगटातील गंभीर आजारी बालकांसाठी श्वसनविकार, न्यूमोनिया, सेप्सिस आणि विषबाधा यांसारख्या आजारांवर अत्याधुनिक अतिदक्षता व आपत्कालीन उपचारांची सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यास मदत होणार आहे. अत्याधुनिक नेत्र विभागात नेत्रतपासणी, निदान आणि शस्त्रक्रिया एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. यासाठी मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ऑपरेटिंग मायक्रोस्कोप, अल्ट्रा-वाइड फिल्ड फंडस कॅमेरा, एनडी याग लेसर, व्हिज्युअल फील्ड ॲनालायझर आणि फेको इमल्सिफिकेशन प्रणालीसारखी आधुनिक उपकरणे उपलब्ध करण्यात आली आहेत. नेत्रदान, नेत्रपटल संकलन आणि जनजागृतीला गती देण्यासाठी विशेष रुग्णवाहिकेची सुविधाही उपलब्ध झाली आहे.
लोकार्पण सोहळ्याला आमदार नंदकिशोर महाजन, आमदार राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आकाश चौधरी उपस्थित होते. प्रास्ताविकात अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचा विकास आणि प्रस्तावित मेडिकल हबची सद्यस्थिती मांडली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर यांनी आभार मानले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply