धुळे जिल्ह्यातील पारधी वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर झालेली निलंबनाची कारवाई मागे घेण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. मुख्याध्यापक किशोर धनजी परदेशी यांना पुन्हा सेवेत रुजू करावे, असे निवेदन जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने गुरुवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांना दिले.
शाळेच्या तपासणीदरम्यान काही त्रुटी आढळल्याने परदेशी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र या प्रकरणातील संपूर्ण वस्तुस्थिती, त्यांची वैद्यकीय परिस्थिती आणि त्यांची बाजू सहानुभूतीने विचारात घ्यावी, अशी भूमिका समितीने मांडली आहे. शाळेच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले परिश्रमही लक्षात घ्यावेत, असे निवेदनात म्हटले आहे.
फक्त मुख्याध्यापकांना जबाबदार धरणे अन्यायकारक
शाळेत पायाभूत सुविधांची कमतरता असताना केवळ मुख्याध्यापकांनाच जबाबदार धरणे अन्यायकारक असल्याचे समितीचे म्हणणे आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून निलंबन रद्द करावे आणि पारधी वस्ती शाळेत आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
चौकशी अहवालानंतर सकारात्मक निर्णयाचे आश्वासन
शिक्षणाधिकाऱ्यांकडून चौकशी अहवाल मिळाल्यानंतर या प्रकरणावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी बेलदार यांनी सांगितल्याचे शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांनी सांगितले. निवेदन देताना समितीचे जिल्हाध्यक्ष योगेश धात्रक, कार्याध्यक्ष रविंद्र पाटील यांच्यासह श्रीकृष्ण सावळे, किशोर पाटील, ज्ञानेश्वर पवार, राजेंद्र भामरे, विश्वनाथ सोमवंशी, मिलिंद वसावे, राजेंद्र मदन भामरे, शरद पाटील, सुधीर पाटील, भटू पाटील, रामदास सोनवणे, धिरज परदेशी, अविनाश काकुळदे, भास्कर परदेशी आणि अतुल पाटील उपस्थित होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply