सिन्नर येथील प्रभाग क्र. ११ मध्ये सरदवाडी मार्गावर भरणाऱ्या भाजी बाजारामुळे वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. वंजारी समाज मैदानापासून ते झापवाडी शाळा आणि ढोकेनगरपासून ते मॉडर्न कॉलनीपर्यंतचा परिसर प्रभाग ११ मध्ये येतो. या प्रभागात कमलनगर, ढोकेनगर, सरस्वतीनगर, जय मल्हार कॉलनी आणि वाजे लॉन्स परिसराचा समावेश आहे. थेट रस्त्यात बाजार भरत असल्याने उपनगरांतील नागरिकच नव्हे, तर आणखी तीन गावांतील ग्रामस्थांनाही या बाजाराने होणाऱ्या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.
अनियमित पाणीपुरवठा आणि रस्ते
प्रभागातील बहुतांश कॉलनी रस्ते अजून होणे बाकी आहे. गणेश मंदिर ते देवी मंदिरापर्यंतचा मार्ग अजूनही काँक्रिटीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. नागरिकांना सर्वाधिक भेडसावणारा प्रश्न म्हणजे अवेळी पाणीपुरवठा; कधी चार दिवसाने, तर कधी सहा दिवसाने पाणीपुरवठा होतो आणि पाणी येण्याची वेळही निश्चित नाही. प्रभागात औद्योगिक वसाहतीतील कामगार वर्ग वास्तव्यास आहे. अवेळी होणारा पाणीपुरवठा आणि अवेळी येणाऱ्या घंटागाडीमुळे नागरिक त्रस्त आहेत.
काही प्रश्न मार्गी, प्रस्ताव तयार
सरदवाडी मार्गावरील वाजे लॉन्सजवळ पावसाळ्यात पाणी साचून राहत होते. त्यामुळे नागरिकांना गुडघाभर पाण्यातून ये-जा करावी लागत होती. मात्र आता हा प्रश्न निकाली निघाला आहे. पाणी वाहून जाण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्याने या त्रासातून काही प्रमाणात नागरिकांची सुटका झाली आहे. नगरसेवकांनी खुल्या भूखंडांची स्वच्छता केल्याने आरोग्याच्या दृष्टीने ही बाबही महत्त्वाची ठरली आहे. प्रभागासाठी ॲम्फी थिएटरचा प्रस्ताव, महिलांसाठी पिंक टॉयलेट, आर्ट गॅलरी आणि स्मार्ट अंगणवाडी, हिंदुहृदयसम्राट हॉस्पिटल आणि जॉगिंग ट्रॅकची उभारणी असे नियोजित प्रस्ताव तयार आहेत.
ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ वाजे आणि खासदार राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जाणार आहेत, असे नगरसेवक शुभम वारुंगसे यांनी सांगितले. मूलभूत सुविधा पुरविण्याबरोबरच वेगळे उपक्रम राबवून प्रभागातील कामकाज आदर्शवत करण्यासाठी प्रस्ताव दिल्याचे नगरसेविका कमळाबाई पगार यांनी सांगितले. नागरिकांनी उपनगरात चांगल्या बगीचाची, ग्रीन जिमची, ज्येष्ठांसाठी बाकांची, वृक्ष लागवडीची आणि विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेची गरज व्यक्त केली आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply