सटाणा ते ठेंगोडा दरम्यानच्या साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील आठ किलोमीटर अंतरात तब्बल ४५ ठिकाणी खंडित असलेले दुभाजक बंद करण्याचे काम सुरू झाले आहे. यामुळे महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या शेतकरी व व्यापाऱ्यांनी मोठा सुटकेचा निश्वास सोडला आहे.
या आठ किलोमीटरच्या टप्प्यात खासगी शाळा, हॉटेल्स, धाबे, दुकाने आणि व्यावसायिक आस्थापना आहेत. तसेच शेतात जाण्यासाठी ठिकठिकाणी दुभाजक तोडण्यात आले होते. तब्बल ४५ ठिकाणी दुभाजक खंडित असल्यामुळे वाहनचालकांकडून मधला मार्ग म्हणून त्यांचा सर्रास वापर केला जात होता. महामार्गावरून वेगाने धावणाऱ्या वाहनांसमोर अचानक दुसरी वाहने आल्याने वारंवार अपघातांना निमंत्रण मिळत होते. विशेषतः रात्रीच्या वेळी हे खंडित मार्ग वाहनचालकांच्या लक्षात न आल्यामुळे परिस्थिती अधिकच धोकादायक बनली होती.
गांधीगिरी आंदोलनाला यश
या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली २९ ऑक्टोबरला ‘गांधीगिरी’ आंदोलन छेडण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान खंडित दुभाजकाच्या ठिकाणी फलक लावून अनधिकृत वाहतूक रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या पाठपुराव्याची दखल घेत महामार्ग प्राधिकरणाचे उपविभागीय अधिकारी परमेश्वर सुतार यांच्याशी चर्चा करून तातडीने दुरुस्तीची मागणी करण्यात आली. कामासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त मिळण्याच्या दृष्टीने पोलीस निरीक्षक योगेश पाटील आणि बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे यांच्याशीही सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. अखेर प्रशासनाच्या समन्वयातून गुरुवारी (ता. ५) महामार्ग प्राधिकरणाने हे खंडित दुभाजक बंद करण्याचे काम प्रत्यक्ष सुरू केले.
या आंदोलनात संदीप भामरे, तुषार वाघ, दिगंबर सोनवणे, अशोक भामरे, आर. टी. सोनवणे, रणधीर मोरे, दादाजी खैरनार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सर्व ४५ दुभाजक तातडीने बंद करण्याची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गांधीगिरी आंदोलनाची दखल घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दुभाजक बंद करण्याचे काम हाती घेतले, याबद्दल महामार्ग प्राधिकरण आणि पोलीस प्रशासनाने सहकार्य केले. मात्र, हे काम अर्धवट न सोडता आठ किलोमीटरमधील सर्व ४५ ठिकाणचे खंडित दुभाजक तातडीने बंद करावेत, अशी मागणी राजेंद्र सोनवणे यांनी केली आहे. या प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा झाल्यानंतरच हे काम मार्गी लागले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply