फुलगाव (ता. हवेली) येथील श्री शिक्षण प्रसारक मंडळाच्या हरी उद्धव धोत्रे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अकरावी व बारावीचे वर्ग सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने या वर्गांना अधिकृत मान्यता दिली आहे. त्यामुळे फुलगावसह आसपासच्या गावांतील विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षणासाठी आता गावातच संधी मिळणार आहे.
तिन्ही शाखांमध्ये शिक्षण
विद्यालयात सध्या दहावीच्या वर्गात १६० हून अधिक विद्यार्थी शिकत आहेत. त्यांच्या गरजा, आवडी आणि पुढील करिअरच्या संधी लक्षात घेऊन विद्यालयात कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांमध्ये अकरावी-बारावीचे शिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या शिक्षणाला या निर्णयामुळे मोठे प्रोत्साहन मिळणार आहे, असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
पंचक्रोशीतील गावांना लाभ
या निर्णयाचा फायदा वढू खुर्द, आपटी, कोरेगाव भीमा, डोंगरगाव, पिंपरी सांडस, डिग्रजवाडी, लोणीकंद आणि तुळापूर या गावांसह पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना होणार आहे. उच्च माध्यमिक शिक्षणासाठी दूर जाण्याची गरज कमी होणार असल्याने विद्यार्थ्यांचा प्रवासाचा वेळ आणि खर्च वाचणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सोय गावातच मिळावी, या उद्देशाने संस्थेने हे पाऊल उचलले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष संजय धोत्रे आणि उपाध्यक्ष प्रवीण रायसोनी यांनी दिली.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply