नवी मुंबईत ५ आणि ६ डिसेंबर रोजी होणाऱ्या फॉर्म्युला चार रेसच्या अंतिम सामन्याची तयारी सुरू आहे. या तयारीसाठी पाम बीच मार्गासह शहरातील अनेक ठिकाणी सिमेंट रेलिंग आणि संरक्षक जाळ्या उभारण्यात येत आहेत. मात्र या कामांचा फटका आता थेट सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बसू लागला आहे. बेलापूरमधील सेक्टर २८ मधील संजय जोशी चौक आणि दारावे बस थांब्यासमोरच सिमेंट रेलिंग व जाळ्या उभारण्यात आल्याने बस थांबे अक्षरशः बंदिस्त झाले आहेत.
बस थांब्यासमोर रेलिंग उभारल्याने प्रवाशांना बसची प्रतीक्षा करण्यासाठी चिंचोळ्या रस्त्यावर उभे राहावे लागत आहे. त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. फॉर्म्युला चार रेसच्या पार्श्वभूमीवर पाम बीच मार्गावर बेलापूरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा सिमेंट रेलिंग उभारून त्यावर जाळ्या लावण्यात येत आहेत. ज्वेल ऑफ नवी मुंबई उद्यान परिसरातील रस्त्यावर प्रेक्षकांसाठी छोटे पूल उभारण्यात आले आहेत.
रस्ते अरुंद, प्रवाशांची गैरसोय
आयोजनाच्या कामांमुळे रस्त्यांची रुंदी आधीच कमी झाली आहे. त्यात बस थांब्यांसमोर रेलिंग आल्याने प्रवाशांना उभे राहायला जागाच उरलेली नाही. बस पकडण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे; बसमधून उतरताना अडचणी येत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून रेसच्या तयारीसाठी शहरभर कामे सुरू आहेत. सुरुवातीला मोठ्या प्रमाणावर झाडे तोडण्यात आली. नंतर अनेक रस्त्यांवर रेलिंग आणि जाळ्या उभारल्याने रस्ते अरुंद झाले. नेरूळ परिसर आणि पाम बीच मार्गावरील या कामांमुळे रोजचा प्रवास त्रासदायक झाला आहे. काही ठिकाणी कामांमुळे अपघातही घडले आहेत. आता बस थांबेच अडथळ्यांनी वेढले गेल्याने बसने प्रवास करणाऱ्यांची गैरसोय वाढली आहे.
नागरिकांची मागणी काय?
स्पर्धेच्या आयोजनातून शहराची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न होत असला, तरी त्यासाठी सामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होऊ नये, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. बस थांब्यांसमोरील रेलिंग तातडीने हटवून प्रवाशांसाठी सुरक्षित जागा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. रहिवासी अभिषेक घाडगे यांनी सांगितले की, गेल्या सहा महिन्यांपासून रेसच्या कामांमुळे नेरूळ परिसर आणि पाम बीच मार्गाची दुरवस्था झाली आहे; बस थांब्यांसमोरही रेलिंग लावल्याने बस पकडण्यासाठी रस्त्यावर उतरून कसरत करावी लागत आहे. रहिवासी विवेक टाव्हरे यांनी सांगितले की, आयोजनामुळे शहराचे नाव मोठे होत असले तरी सामान्य नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी महापालिकेने आवश्यक उपाययोजना कराव्यात. नवी मुंबई महापालिकेच्या महापौर सुजाता पाटील यांनी सांगितले की, बस थांब्यांसमोरील रेलिंग प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हटवून अन्यत्र लावण्यात येतील. त्यामुळे प्रवाशांना रस्त्यावर न उतरता बस थांब्यावरून सुरक्षितपणे प्रवास करता येईल आणि याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात येईल.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply