शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध व्हावी, यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत खेड तालुक्यातील पानमंदवाडी येथे पाच मेगावॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे कडूस वीज उपकेंद्रांतर्गत २ हजार ५०४ शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे. प्रकल्पाचे लोकार्पण बुधवारी (ता. ४) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ऑनलाइन करण्यात आले.
सिंचनाचे नियोजन सोपे होणार
चाकण येथे राजगुरुनगर सहकारी बँकेच्या २० व्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी हा लोकार्पण कार्यक्रम झाला. सौर कृषी वाहिनी योजनेतून राज्यभर विकेंद्रित पद्धतीने सौरऊर्जा प्रकल्प उभारले जात आहेत. या प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना सिंचनाचे नियोजन करणे सोयीचे होणार आहे. रात्रीच्या वेळी शेतात पाणी देण्यासाठी जाण्याची गरज कमी झाल्याने बिबट्या आणि अन्य वन्यप्राण्यांपासून होणारा धोका टाळण्यासही मदत होणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
पानमंदवाडी येथील प्रकल्पाची उभारणी अवाडा कंपनीने केली असून, त्यासाठी सुमारे २० कोटी ७५ लाख रुपये खर्च आला आहे. प्रकल्पात निर्माण होणारी वीज ५.८ किलोमीटर लांबीच्या ११ केव्ही वाहिनीद्वारे ३३ केव्ही कडूस उपकेंद्रापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. स्थानिक पातळीवर सौरऊर्जेची निर्मिती करून तिचा वापर शेतीपंपांसाठी केला जाणार आहे.
उपकेंद्राची क्षमता वाढणार
कडूस उपकेंद्रांतर्गत एकूण ८ हजार ६४३ वीजग्राहक आहेत. त्यापैकी २ हजार ५०४ कृषी ग्राहक आहेत. वाढत्या विजेच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर उपकेंद्रात पाच एमव्हीए क्षमतेचे अतिरिक्त उच्चदाब रोहित्र बसवण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर उपकेंद्राची एकूण क्षमता १५ एमव्हीए होणार आहे. या वेळी आमदार बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, चाकण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मनिषा गोरे, महावितरणचे पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर, पुणे ग्रामीण मंडळाचे अधीक्षक अभियंता सुरेश सवाईराम, कार्यकारी अभियंता केशव काळुमाळी, अवाडा कंपनीचे फतेह सिंग आणि मुर्तुजा काझी उपस्थित होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply