कळंब तालुक्यातील प्रवाशांना राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेतील बदलांचा मोठा फटका बसत आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या लांब पल्ल्याच्या बससेवा बंद करण्यात आल्या असून, काही बसचे मार्ग बदलण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
चाळीस वर्षांची बस वळवण्यात आली
निलंगा ते छत्रपती संभाजीनगर ही बस गेल्या ४० ते ५० वर्षांपासून मुरूड, ढोकी आणि कळंब मार्गे धावत होती. मात्र गेल्या १५ ते २० दिवसांपासून ही बस अंबाजोगाई कारखाना मार्गे वळवण्यात आली आहे. त्यामुळे कळंबमधील प्रवाशांना या बससेवेपासून वंचित राहावे लागत आहे. याशिवाय कळंब-अक्कलकोट, कळंब-जालना आणि कळंब-नांदेड यांसह अन्य लांब पल्ल्याच्या मार्गांवरील बससेवाही बंद करण्यात आल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याऐवजी सुरू असलेल्या सेवाच कमी होत असल्याने महामंडळाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. प्रवासी मित्र संघटनेचे प्रा. मोहन जाधव यांनी बंद केलेल्या आणि मार्ग बदललेल्या बससेवा पूर्ववत कराव्यात, अशी मागणी केली आहे. तसे न झाल्यास आंदोलनासह उपोषण करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
नवीन बससेवेची मागणी
निलंगा-छत्रपती संभाजीनगर बस पूर्वीच्या मुरूड-ढोकी-कळंब मार्गावरून तातडीने सुरू करावी, अशी मागणी प्रा. जाधव यांनी केली आहे. तसेच तांदूळजा-शिराढोण मार्गे छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या शहरांसाठी नवीन बससेवा सुरू करावी, अशीही मागणी त्यांनी परिवहन मंत्र्यांकडे केली आहे. प्रवाशांची संख्या, मार्गाची गरज आणि स्थानिक नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन महामंडळाने बससेवेचे नियोजन करावे, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कळंब आगारात शिवाई आणि राजमाता जिजाऊ या नव्या बस दाखल झाल्या आहेत. मात्र या बसवरील डिजिटल फलकावर हैदराबाद आणि कंपनीच्या जाहिराती झळकत असताना बस नेमकी कोणत्या गावाकडे किंवा शहराकडे जात आहे, याची माहिती दिसत नसल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. बसच्या जाण्या-येण्याचे नियोजन समजण्यासाठीच डिजिटल फलकाचा उपयोग होत नसेल, तर या तंत्रज्ञानाचा उपयोग नेमका कोणासाठी, असा सवाल प्रवाशांतून उपस्थित केला जात आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply