पिंपरी-चिंचवड येथे आयोजित शालेय विभागीय मैदानी स्पर्धेत कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल अँड ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत तेरा पदके पटकावली. या स्पर्धेत विद्यालयाचे १६ मुले आणि ६ मुली असे एकूण २२ खेळाडू सहभागी झाले होते.
मुलांच्या गटातील कामगिरी
१७ वर्षांखालील मुलांच्या गटात किशोर पावरने ११० मीटर हर्डल्स स्पर्धेत १६.५ सेकंद वेळ नोंदवत रौप्यपदक पटकाविले. त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. प्रफुल्ल वसावे याने १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत ४ मिनिटे ३५ सेकंद वेळ नोंदवत ब्राँझपदक मिळवले. १९ वर्षांखालील मुलांच्या गटात ४०० मीटर रिले स्पर्धेत सचिन वराठा, विपुल वळवी, रोहन कोंब, विवेक चौधरी आणि यशराज चव्हाण यांच्या संघाने ३ मिनिटे ३८ सेकंद वेळ नोंदवत रौप्यपदक पटकाविले, तर १०० मीटर रिले स्पर्धेत सचिन वराठा, प्रतीक ठिंगळे, रोहन कोंब, विवेक चौधरी आणि आकाश ठाकरे यांच्या संघाने ४५ सेकंद वेळ नोंदवत ब्राँझपदक मिळवले.
मुलींच्या गटातही यश; दोन खेळाडू राज्यस्तरावर
१९ वर्षांखालील मुलींच्या गटात पूनम पटले हिने बांबू उडी प्रकारात रौप्यपदक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी स्थान निश्चित केले. विभागीय स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर किशोर पावर (११० मीटर हर्डल्स) आणि पूनम पटले (बांबू उडी) या दोन खेळाडूंची राज्यस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशस्वी खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक अजित पवार, दीपाली येनपुरे, अण्णासाहेब गोपाल आणि अजय खरात यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, विश्वस्त मंडळातील सदस्य, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, साईनाथ वर्पे, मीरा पटेल, प्राचार्य माणिक जाधव, मीनाक्षी काकडे आणि नामदेव डांगे यांनी या खेळाडूंचे अभिनंदन केले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply