वजन आटोक्यात ठेवण्यासाठी आणि तब्येत चांगली राखण्यासाठी आज अनेकजण ग्रीन टी पितात. सकाळची सुरुवात ग्रीन टीने करणारेही कमी नाहीत. दिवसातून अनेकदा ग्रीन टी पिणे ही अनेकांची रोजची सवय झाली आहे. शरीराची चयापचय क्रिया सुधारण्यास आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास ग्रीन टी उपयुक्त मानली जाते. मात्र आरोग्यासाठी चांगली मानली जाणारी हीच ग्रीन टी प्रमाणाबाहेर प्यायली तर उलट त्रासदायक ठरू शकते. विशेषतः उपाशीपोटी किंवा जास्त प्रमाणात ती प्यायल्यास पचनाच्या तक्रारी, लोह शोषणात अडथळा आणि कॅफिनमुळे होणारे त्रास जाणवू शकतात. त्यामुळे ग्रीन टी पिण्यापूर्वी तिचे संभाव्य दुष्परिणाम माहिती असणे गरजेचे आहे.
लोहाचे शोषण आणि पचनावर परिणाम
ग्रीन टीमध्ये कॅटेचिन नावाचा घटक असतो. हा घटक अन्नातून मिळणाऱ्या लोहाचे शरीरात शोषण होण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणू शकतो. त्यामुळे जेवणासोबत किंवा जेवण झाल्यानंतर लगेच ग्रीन टी पिणे टाळावे. ज्यांच्या शरीरात आधीपासूनच लोहाची कमतरता आहे, त्यांनी याबाबत विशेष काळजी घ्यावी. आहारात लोह आणि व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थांचा समावेश करणेही महत्त्वाचे आहे. काहीजण उपवासाच्या काळात ग्रीन टी पिणे पसंत करतात. मात्र रिकाम्या पोटी ग्रीन टी प्यायल्याने काहींना पचनाशी संबंधित त्रास जाणवू शकतो. मळमळ, उलट्या आणि बद्धकोष्ठता यांसारख्या तक्रारी त्यात येतात. त्यामुळे उपवासात किंवा सकाळी उपाशीपोटी ग्रीन टी पिताना काळजी घेणे आवश्यक आहे.
कॅफिनचे प्रमाण आणि गर्भवती महिलांनी घ्यावयाची काळजी
ग्रीन टीमध्ये कॅफिन असते. त्यामुळे दिवसातून अनेक कप ग्रीन टी प्यायल्यास शरीरातील कॅफिनचे प्रमाण वाढू शकते. त्याचा परिणाम झोपेवर आणि मानसिक आरोग्यावर होऊ शकतो. काहींना अस्वस्थता, चिंता, चिडचिड किंवा पचनाच्या तक्रारी जाणवू शकतात. त्यामुळे ग्रीन टीचे सेवन मर्यादित प्रमाणात करणे आवश्यक आहे. गर्भवती महिलांनी ग्रीन टीचे अतिसेवन टाळावे. ग्रीन टीमधील कॅफिनचे जास्त प्रमाण गर्भधारणेदरम्यान त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे गर्भवती महिलांनी दिवसातून किती ग्रीन टी प्यावी, याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. स्तनपान करणाऱ्या महिलांनीही काळजी घेणे गरजेचे आहे. ग्रीन टीमधील कॅफिन आईच्या दुधातून बाळाच्या शरीरात जाऊ शकते. त्यामुळे बाळाच्या झोपेवर आणि आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते.
प्रतिक्रिया व्यक्त करा