डिमिलिटेशन विधेयकावरून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी या विधेयकाच्या बाजूने मतदान करणार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी या विधेयकाला विरोध करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या विधेयकामुळे संपूर्ण देशाला त्रास होऊ शकतो, असा आरोप ठाकरेंनी केला. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या विधेयकावरून मोदी सरकारवर जोरदार टीका केली.
तीन सदस्यांची समिती आणि ठाकरेंचा आक्षेप
पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, ते देशाचा आणि राज्याचा अधिक विचार करतात. विधेयकावर अनेकांनी मते मांडली आहेत. शिवसेनेने विरोध करण्याची भूमिका का घेतली, याचे कारण सांगताना ते म्हणाले की, डिमिलिटेशन करण्याची समितीवर मतचोरीचा आरोप झाला आहे आणि तो जनतेत सिद्ध झाला आहे. त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी होत आहे. ज्ञानेश कुमार यांनाच समितीवर ठेवण्यात आले आहे. ही समिती तीन जणांची असेल. त्यात ज्ञानेश कुमार आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असणार आहेत. त्यांना निवडण्याचा अधिकार नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी केला आहे. ही त्यांची व्यक्ती असेल. या समितीतील तिसरी व्यक्ती ज्ञानेश कुमार निवडतील. यात विरोधकांचाही समावेश नाही, असे ठाकरे म्हणाले.
भाजपकडे स्क्रिप्ट तयार असल्याचा आरोप
भाजपकडे स्क्रिप्ट तयार आहे. या स्क्रिप्टवर सह्या ठोकून जनतेसमोर आणायचे, हेच त्या समितीचे काम आहे, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. डिमिलिटेशन विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतभेद सुरू असतानाच ठाकरेंच्या या भूमिकेमुळे राजकीय चर्चेला आणखी वेग आला आहे. या विधेयकावर पुढे काय घडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा