२७ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या ये प्रेम मोल लिया आणि गनमास्टर जी९ या दोन चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर चुरशीची टक्कर सुरू आहे. दुसऱ्या दिवशी शर्वरी वाघ आणि आयुष्यमान खुराना यांच्या ये प्रेम मोल लिया या चित्रपटाने बाजी मारली आहे. या चित्रपटाच्या कमाईत तब्बल ३१.३ टक्क्यांची वाढ झाली आहे.
ये प्रेम मोल लिया ची कमाई किती?
ये प्रेम मोल लिया ने दुसऱ्या दिवशी भारतात ५.२५ कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली. पहिल्या दिवशी या चित्रपटाने ४ कोटी रुपये कमावले होते. त्यामुळे दुसऱ्या दिवसाच्या कमाईत ३१.३ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. दोन दिवसांत चित्रपटाची भारतातील एकूण निव्वळ कमाई ९.२५ कोटी रुपये, तर एकूण ग्रॉस कमाई ११ कोटी रुपये झाली आहे. दुसऱ्या दिवशी चित्रपटाचे देशभरात ७,१२६ शो झाले. या शोमध्ये सरासरी १४ टक्के प्रेक्षकांची उपस्थिती होती. शनिवारी चित्रपटाची सुमारे २ लाख ३८ हजार ६७५ तिकिटे विकली गेली. परदेशात दुसऱ्या दिवशी चित्रपटाने ४ कोटी रुपये कमावले. त्यामुळे परदेशातील एकूण ग्रॉस कमाई ७.७५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. भारत आणि परदेशातील कमाई मिळून चित्रपटाची दोन दिवसांची जगभरातील एकूण ग्रॉस कमाई १८.७५ कोटी रुपये झाली आहे.
गनमास्टर जी९ ची कामगिरी कशी?
दुसरीकडे इमरान हाश्मीच्या गनमास्टर जी९ ने दुसऱ्या दिवशी भारतात ४.३५ कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली. या चित्रपटाचे ७,५९१ शो झाले होते. पहिल्या दिवसाची कमाई ३.६५ कोटी रुपये होती. त्यामुळे दोन दिवसांत भारतातील एकूण निव्वळ कमाई ८ कोटी रुपये, तर ग्रॉस कमाई ९.५० कोटी रुपये झाली आहे. परदेशातील मार्केटमध्ये या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ५० लाख रुपये कमावले. त्यामुळे परदेशातील एकूण ग्रॉस कमाई ८० लाख रुपये झाली आहे. भारत आणि परदेशातील कमाई मिळून गनमास्टर जी९ ची दोन दिवसांची जगभरातील एकूण ग्रॉस कमाई १०.३० कोटी रुपये झाली आहे. सध्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईत शर्वरीचा चित्रपट पुढे असला तरी आगामी दिवसांत प्रेक्षकांचा प्रतिसाद कोणत्या चित्रपटाला अधिक मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा