देशासाठी शौर्य गाजवणाऱ्या आणि प्राणांची पर्वा न करता देशाचे रक्षण करणाऱ्या वीर जवानांसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. चक्र मालिकेतील वीरता पुरस्कार मिळवलेल्या जवानांना आता वंदे भारतसह देशातील सर्व रेल्वे गाड्यांमधून मोफत प्रवास करता येणार आहे. यापूर्वी ही सुविधा काही ठराविक रेल्वे गाड्यांपुरती मर्यादित होती. मात्र आता सरकारने या सुविधेचा विस्तार केला आहे. भारतीय लष्कराने बुधवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून या निर्णयाची माहिती दिली. रेल्वे मंत्रालयाने संरक्षण मंत्रालयाशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे लष्कराने स्पष्ट केले आहे.
कोणत्या गाड्यांचा समावेश आणि पूर्वीची सुविधा
या नव्या सुविधेमध्ये वंदे भारतसह मेल, एक्स्प्रेस आणि इतर सर्व प्रकारच्या रेल्वे गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. या निर्णयामुळे वीरता पुरस्कार मिळवलेल्या जवानांना रेल्वे प्रवास करताना अधिक सोय होणार आहे. विशेष म्हणजे, यामुळे पुरस्कार विजेत्यांना यापूर्वी मिळणाऱ्या प्रवासाच्या सुविधा आणि अधिकारांमध्ये कोणताही बदल होणार नाही. केवळ मोफत प्रवासाची सुविधा आता सर्व रेल्वे गाड्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी या पुरस्कार विजेत्यांना रेल्वेकडून विशेष पास दिले जात होते. या पासच्या माध्यमातून त्यांना ठराविक नियमांनुसार मोफत प्रवास करता येत होता. फेब्रुवारी २०१४ मध्ये परमवीर चक्र आणि महावीर चक्र विजेत्यांसाठी राजधानी, शताब्दी आणि दुरंतो यांसारख्या गाड्यांमध्येही सुविधा वाढवण्यात आली होती. त्यानंतर ऑगस्ट २०१७ मध्ये अशोक चक्र आणि कीर्ती चक्र विजेत्यांनाही मोफत प्रवासाची सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
शौर्य पुरस्कारांचा इतिहास
भारत सरकारने स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीर चक्र या तीन शौर्य पुरस्कारांची सुरुवात केली होती. हे पुरस्कार १५ ऑगस्ट १९४७ पासून लागू मानले जातात. त्यानंतर अशोक चक्र, कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र या पुरस्कारांचाही समावेश करण्यात आला. देशातील सर्वोच्च शौर्य पुरस्कारांमध्ये परमवीर चक्राला विशेष स्थान आहे. देशासाठी योगदान देणाऱ्या शूर जवानांचा सन्मान करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा