भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आता राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा जोरात आहे. तो भारतीय जनता पक्षात सामील होऊ शकतो, असे बोलले जात आहे. शमीने काल रात्री दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्याच्या राजकीय प्रवेशाबाबतच्या चर्चांना आणखी वेग आला आहे.
दिल्लीतील भेटीत काय घडले?
भाजप अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष कुंवर बासित अली यांनी शमी आणि नितीन नवीन यांच्या भेटीचे आयोजन केले होते. ही भेट काल रात्री दिल्लीतील नवीन यांच्या कार्यालयात झाली. या भेटीवेळी बासित अलीही उपस्थित होते. शमी भाजपमध्ये आल्यास त्याला पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीत मोठी जबाबदारी मिळू शकते, अशी चर्चा आहे. तसेच तो भाजपच्या तिकिटावर अमरोहा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवू शकतो, असेही वृत्त आहे.
कसोटीतून निवृत्तीनंतर नवा टप्पा
शमीने ६ नोव्हेंबर रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. भारतासाठी खेळणे हा नेहमीच अभिमानाचा विषय असल्याचे त्याने आपला निर्णय जाहीर करताना म्हटले होते. पांढरी जर्सी सोडत असलो तरी तिच्याशी जोडलेल्या आठवणी कायम सोबत राहतील, असे त्याने नमूद केले होते. पहिल्यांदा कसोटी जर्सी घातली तेव्हा देशासाठी काहीतरी करण्याचे एकच स्वप्न होते, असेही तो म्हणाला होता. प्रत्येक विकेट, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक दुखापत आणि प्रत्येक पुनरागमनाने आपल्याला काहीतरी शिकवले, असे त्याने म्हटले होते. कसोटी क्रिकेट हा त्याच्या आयुष्याचा अत्यंत खास भाग असल्याचे सांगत त्याने जड अंतःकरणाने निवृत्तीचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले होते. सहकारी, प्रशिक्षक, कुटुंबीय आणि लाखो चाहत्यांचे त्याने आभारही मानले होते.
प्रतिक्रिया व्यक्त करा