देशभरात मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून, म्हणजेच डिलिमिटेशन विधेयकावरून, राजकीय वातावरण तापले आहे. केंद्र सरकारने ३० नोव्हेंबर रोजी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले असून या अधिवेशनात हे विधेयक मांडण्याची तयारी सुरू आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी या विधेयकाला आधीच जोरदार विरोध दर्शवला आहे. आता कॉक्रोच जनता पार्टीनेही या विधेयकाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
सौरभ दास यांनी काय म्हटले?
कॉक्रोच जनता पार्टीचे नेते आणि प्रवक्ते सौरभ दास यांनी या विधेयकाला जोरदार विरोध केला आहे. या विधेयकांतर्गत घेतलेल्या निर्णयांना न्यायालयात आव्हान देता येणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. म्हणजेच मतदारसंघांची पुनर्रचना अन्यायकारक पद्धतीने केली जात असेल, तरी त्याविरोधात न्यायालयात दाद मागता येणार नाही, असा त्यांचा आक्षेप आहे. हे सर्व केवळ भाजपच्या फायद्यासाठी केले जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. विरोधी पक्षांना देशातून पूर्णपणे संपवणे हा यामागचा उद्देश असल्याचे दास म्हणाले.
विरोधी पक्षांना आवाहन
भाजप इतर राजकीय पक्षांतील खासदारांचा घोडेबाजार करत असल्याचा आरोपही दास यांनी केला. त्यांनी विरोधी पक्ष आणि खासदारांना या विधेयकाला तीव्र विरोध करण्याचे आवाहन केले. या विधेयकाला बिगर-एनडीए पक्षांकडून मिळत असलेल्या पाठिंब्यावर टीका करताना ते म्हणाले की, तरुणांच्या नेतृत्वाखालील चळवळ बळकट करणे आणि त्यांचा आवाज बुलंद करणे ही विरोधी पक्षांची जबाबदारी आहे. मात्र त्याऐवजी काही पक्ष भाजपसोबत उभे राहून विधेयक मंजूर करण्यास मदत करत आहेत, असा घणाघात त्यांनी केला.
दरम्यान, देशाला आणि लोकशाहीला उद्ध्वस्त करणारे विधेयक मंजूर करण्यास भाजपला मदत करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांवर आपली नजर असल्याचेही दास यांनी सांगितले. देशातील तरुण पिढीही त्यांच्यावर नजर ठेवून आहे, असे ते म्हणाले. राजकीय पक्ष लोकशाहीच्या बालेकिल्ल्याचे रक्षण करतील, अशी तरुणांना खूप अपेक्षा आहे. पण जर त्यांनी देशाशी गद्दारी केली, तर तरुण पिढी त्यांना कधीही माफ करणार नाही, असा इशाराही दास यांनी दिला.
प्रतिक्रिया व्यक्त करा