मराठी रंगभूमीवर सध्या ‘आमने सामने’ या नाटकाभोवती सुरू असलेला वाद चर्चेचा विषय ठरला आहे. या वादाच्या केंद्रस्थानी कलाकारांचे मानधन आणि नाटकांच्या आर्थिक व्यवहारांचा प्रश्न आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेते आणि लेखक संजय मोने यांनी केलेल्या एका पोस्टने नव्याने चर्चा पेटवली होती. कोणाचेही नाव न घेता त्यांनी व्यावसायिक नाटकांच्या नफा-तोट्याच्या गणितावर प्रश्न उपस्थित केले होते. आता एका मुलाखतीत त्यांनी त्या पोस्टमागील आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
नाटक चाललं की व्यवसाय, बुडालं की कला
मोने म्हणाले की, एखादे नाटक चांगले चालते आणि त्यातून उत्पन्न मिळते, तेव्हा ते लगेच व्यवसाय ठरते. पण त्याच नाटकाचे उत्पन्न कमी झाले की निर्मात्याला कला आठवते. कलाकारांच्या बाबतीतही असेच घडते, असे त्यांचे म्हणणे आहे. एखादे चांगले नाटक आहे हे माहिती असूनही कलाकार कधीकधी कळ सोसून काम करतात आणि पन्नास ते पंच्याहत्तर टक्के मानधनावर काम करण्याची तयारी दाखवतात. मात्र नाटक सुदैवाने चालायला लागले, तर आधी कमी घेतलेले पैसे निर्मात्याकडून ताबडतोब मिळत नाहीत. हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच निर्माते असे पैसे परत देतात, असे मोने यांनी सांगितले. त्यामुळे या संपूर्ण व्यवस्थेला काही अर्थ उरत नाही, अशी त्यांची टिप्पणी आहे.
वाद नेमका कशावरून सुरू झाला?
‘आमने सामने’ या नाटकातील कलाकार रोहन गुजर आणि केतकी पालव यांनी मानधनाचा मुद्दा समाजमाध्यमांवर मांडला होता. मानधनात वाढ मागितल्यामुळे निर्मात्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता आपल्याला नाटकातून काढल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर नाटकाचे निर्माते मंगेश कदम आणि लीना भागवत यांनीही आपली बाजू मांडली. कलाकारांकडून वारंवार अवास्तव मानधनवाढीची मागणी होत असल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. या दोन्ही बाजू समोर आल्यानंतर रंगभूमीवरील मानधन आणि कलाकारांचे हक्क याबाबत व्यापक चर्चा सुरू झाली आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा