भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू युजवेंद्र चहल याने राजकारणातील नव्या इनिंगला सुरुवात केल्यानंतर आता आणखी एका क्रिकेटपटूच्या राजकीय प्रवेशाबाबत चर्चा सुरू झाली आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका २०२७ मध्ये होणार असून सर्व राजकीय पक्षांकडून त्याची तयारी सुरू आहे. त्याचदरम्यान शमीच्या भाजप नेत्यांसोबतच्या भेटींमुळे या चर्चांना बळ मिळाले आहे.
शमीने कोणाकोणाची भेट घेतली?
काही महिन्यांपूर्वी मोहम्मद शमीने आरएलडीचे अध्यक्ष जयंत चौधरी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता त्याने भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन नवीन यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष कुंवर बासित अली हेही उपस्थित होते. या भेटीचे फोटो सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. शनिवारी झालेल्या या भेटीनंतर शमीच्या राजकीय प्रवेशाबाबतच्या तर्कवितर्कांना अधिकच बळ मिळाले आहे.
शमीचे म्हणणे काय?
मोहम्मद शमीने मात्र या चर्चांचे वारंवार खंडन केले आहे. राजकारणात येण्याचा अद्याप कोणताही विचार केलेला नाही, असे त्याने स्पष्ट केले आहे. जर भविष्यात त्याने असा निर्णय घेतला, तर तो नक्कीच सर्वांना कळवेल, असेही त्याचे म्हणणे आहे. या भेटीला त्याने ‘खासगी बाब’ असल्याचे म्हटले आहे. शमी पश्चिम बंगालसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळत असला, तरी तो उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे राहतो. त्यामुळे २०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत तो अमरोहा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतो, अशी चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहे. अलीकडेच शमीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणाही केली आहे. दरम्यान, इतर काही वृत्तांनुसार शमीचा भाऊ हसीब अहमद निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार म्हणून उतरू शकतो. तर शमी स्वतः मात्र पूर्णपणे आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करण्याच्या विचारात आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा