डिलिमिटेशन विधेयकावरून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना एक मोठं पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी विधेयकाच्या विरोधात भूमिका घेण्याचं आवाहन केलं आहे. पत्र लिहिताना त्यांनी स्वतःचा उल्लेख आमदार म्हणून न करता देशातील एक नागरिक आणि स्वाभिमानी महाराष्ट्रातील एक कार्यकर्ता असा केला आहे. त्यामुळे या पत्रावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
महिला आरक्षण आणि डिलिमिटेशनचा संबंध नाही
भाजपकडून डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण यांची सांगड घातली जात आहे, असं रोहित पवार यांनी पत्रात म्हटलं आहे. मात्र या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी काहीही संबंध नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. २०२३ मध्येच महिला आरक्षण विधेयक संसदेने मंजूर केलं असून आपल्या पक्षानेही त्याला पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्याची अंमलबजावणी आत्ताच करता येते, मग ती का केली जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
२०२४ मध्ये भाजपाच्या अनेक नेत्यांनी ४०० पार चा नारा देत संविधान बदलण्याची भाषा उघडपणे केली होती, असंही पत्रात नमूद केलं आहे. त्यावेळी देशातील जनतेने त्यांना गुडघ्यावर आणलं, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. संविधान बदलण्याचा भाजपाचा मूळ अजेंडा अजूनही कायम असून डिलिमिटेशनच्या माध्यमातून असंविधानिक पद्धतीने आपल्या सोयीचे मतदारसंघ तयार करून संविधान बदलाचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
डिलिमिटेशन समितीचं अध्यक्षपद विरोधी पक्षनेत्याला द्या?
भाजपाला लोकशाही आणि संविधानाबाबत प्रेम आणि निष्ठा असेल तर डिलिमिटेशन समितीचं अध्यक्षपद विरोधी पक्षनेत्याला दिलं जाईल का, असा सवाल रोहित पवार यांनी पत्रात केला आहे. या प्रश्नाच्या उत्तरातूनच त्यांचा हेतू उघड होईल, असं त्यांनी म्हटलं आहे.
आपल्याच पक्षातील सत्तापिपासू मंडळी आपल्या मनात अनेक गोष्टी भरवत असावीत, असंही पत्रात म्हटलं आहे. आर्थिक ताकद आणि सत्ता असल्याशिवाय निवडणुका जिंकायच्या तरी कशा, हा त्यांचा नेहमीचा युक्तीवाद असल्याचं रोहित पवार यांनी नमूद केलं आहे. मात्र याचाच विचार करत बसलो तर सामान्य जनतेचे मुद्दे मांडायचे कुणी, हा मोठा प्रश्न असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा