सोमवारी मतदारसंघ पुनर्रचना विधेयक संसदेत सादर केले जाणार आहे. त्यापूर्वी इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या हालचालींना वेग आला असून शरद पवार यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मुंबईत कोण कोण येणार?
सोनिया गांधी, राहुल गांधी, ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी मुंबईत येणार आहेत. हे सर्व नेते शरद पवार यांची भेट घेऊन विधेयकावर चर्चा करणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे दुपारी दोन वाजता स्टॅलिन यांची आणि रात्री आठ वाजता पवार यांची भेट घेणार आहेत. सोनिया गांधीही खरगे यांच्यासोबत पवार यांना भेटण्याची शक्यता आहे.
राहुल गांधी, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि रेवंत रेड्डी एकाच विमानाने चेन्नईला रवाना होणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हेदेखील संध्याकाळी शरद पवार यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
दिल्लीत उद्या बैठक
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची उद्या सकाळी नऊ वाजता दिल्लीत बैठक होणार आहे. दिल्लीतील पवार यांच्या निवासस्थानी सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात खासदारांची ही बैठक होईल. बाळ्या मामा म्हात्रे वगळता सर्व खासदार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. विधेयकाच्या बाजूने मतदान करायचे की विरोधात, यावर या बैठकीत चर्चा होणार आहे.
दरम्यान, संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील वरिष्ठ मंत्र्यांची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी दुपारी बारा वाजता ही बैठक होण्याची शक्यता असून अधिवेशनाबाबत रणनीती ठरणार आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा