मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या भीषण रस्ते अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. बोलेरोचा चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघात नेमका कसा झाला?
शाहगढ पोलीस ठाण्याच्या हद्दीत टीकमगड रस्त्यावर सिमरिया गावाच्या पुढे बीला नदीच्या पुलाजवळ रात्री सुमारे दोन वाजता ट्रक आणि बोलेरोची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की बोलेरोच्या पुढील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.
मृतांची ओळख पटली
मृतांमध्ये छतरपूर जिल्ह्यातील हरिनगर येथील २६ वर्षीय प्रमोद सिंह लोधी आणि बदलेन खेडा येथील ३५ वर्षीय उत्तम यादव यांचा समावेश आहे. लोधी हे राष्ट्रीय बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष होते, तर यादव हे काँग्रेस पक्षाशी संबंधित होते. दोघेही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय होते.
अपघाताची माहिती मिळताच शाहगढ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. जखमी चालकाला प्रथमोपचारानंतर पुढील उपचारांसाठी सागर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ट्रक आणि बोलेरोची धडक नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शाहगढ पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
प्रतिक्रिया व्यक्त करा