परिसीमन (डिलिमिटेशन) विधेयकावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात चर्चा सुरू झाली आहे. आमदार रोहित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना पत्र लिहून या विधेयकावर फेरविचार करण्याची मागणी केली आहे. शरद पवार यांच्या विचारांचा वारसा आणि महाराष्ट्राचे हित यांचा हवाला देत त्यांनी ही भूमिका मांडल्याचं सांगितलं जात आहे. या पत्रानंतर पक्षात नवी चर्चा सुरू झाली असून खासदार बजरंग सोनवणे यांनी त्यावर आपली भूमिका मांडली आहे.
सोनवणे यांचा सवाल; पत्र पाहिलंच नाही
खासदार बजरंग सोनवणे यांनी या पत्राबाबत आश्चर्य व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, हे पत्र आपण पाहिलेलंच नाही आणि ते आधी बघावं लागेल. खासदारांनी विधेयकाच्या बाजूने मतदान करायचं की विरोधात, याबाबत पक्षाकडून अद्याप कोणताही अधिकृत आदेश आलेला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. मग रोहित पवार यांना ही माहिती कुठून मिळाली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
पक्षाच्या नेतृत्वाकडून किंवा सुप्रिया सुळे यांच्याकडून अद्याप कोणताही निरोप मिळालेला नसल्याचं सोनवणे यांनी सांगितलं. आपल्याशीच नव्हे, तर पक्षाच्या पाच-सहा खासदारांपैकी कोणाशीही याबाबत चर्चा झालेली नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. सोमवारी सर्व खासदारांनी एकत्र भेटून चर्चा करायची होती, त्यामुळे पक्षाचा निर्णय सर्वांशी चर्चा करूनच होईल, असं ते म्हणाले.
पत्र माध्यमांसमोर का, यावर भाष्य टाळलं
रोहित पवार यांनी पत्र माध्यमांसमोर का आणलं, या प्रश्नावर सोनवणे यांनी भाष्य करणं टाळलं. रोहित पवार हे पक्षाचे नेते आहेत आणि त्यांनी सुप्रिया सुळे यांना पत्र दिलं आहे. ते माध्यमांना का दिलं, यावर आपण बोलणं योग्य नाही, तेच याबाबत सांगू शकतील, असं सोनवणे म्हणाले.
दरम्यान, विधेयकाचा मसुदा हातात आल्यानंतरच पक्षाची भूमिका स्पष्ट होईल, असं सुप्रिया सुळे यांनी यापूर्वी सांगितलं होतं. त्यामुळे आता खासदारांच्या बैठकीत काय निर्णय होतो आणि रोहित पवार यांच्या पत्रावर पक्षाचं नेतृत्व काय भूमिका घेतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा