सांगली शहरातील सिव्हिल हॉस्पिटल चौक ते शंभरफुटी रस्त्याचे काम अकरा महिन्यांपासून रखडल्याने काँग्रेसने शुक्रवारी सिव्हिल चौकात रास्ता रोको आंदोलन केले. महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते तथा विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
महापालिकेच्या उपायुक्त विद्या पाटील आणि नगर अभियंता ऋतुराज यादव यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. शनिवारपासून रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
## रुग्णांना आणि वाहनचालकांना त्रास
सिव्हिल हॉस्पिटल ते शंभरफुटी रस्ता हा शहरातील अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे. या परिसरात अनेक रुग्णालये आणि पॅथॉलॉजी लॅब असल्याने रुग्ण, नातेवाईक तसेच रुग्णवाहिकांची सतत ये-जा सुरू असते. मात्र, हा रस्ता खराब झाला आहे. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णवाहिकांनाही खड्ड्यांतून वाट काढताना अडचणी येत आहेत.
या रस्त्याच्या कामासाठी महापालिकेने ९१ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. जानेवारी २०२६ मध्ये ठेकेदाराला वर्क ऑर्डरही देण्यात आली. मात्र, अकरा महिने उलटूनही काम सुरू झाले नाही. निधी मंजूर झाला, वर्क ऑर्डर जारी झाली; तरीही रस्त्याचे काम कागदावरच राहिल्याने काँग्रेसने आंदोलनाचा पवित्रा घेतला.
## आंदोलनात अनेक पदाधिकारी सहभागी
मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी सिव्हिल चौकात रास्ता रोको केला. यावेळी नगरसेवक फिरोज पठाण, स्मिता यमगर, सोनल पाटील, विक्रम पाटील सावर्डेकर, राजू यमगर, रामचंद्र माने, राजाराम माने, विजय आवळे आदी उपस्थित होते.
प्रतिक्रिया व्यक्त करा