गोवा विधानसभा निवडणूक २०२७ च्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने महाराष्ट्रातील नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसकडून १२ विशेष निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, काँग्रेस अध्यक्षांनी या नियुक्त्यांना मंजुरी दिली आहे. पक्षाचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली.
निरीक्षकांची नावे आणि जबाबदारी
घोषणेसोबत जाहीर झालेल्या नावांमध्ये रिझवान अर्शद, अन्वर सादथ, सजीव जोसेफ, चांडी ओम्मेन, प्रवीण कुमार आणि श्रीनिवास माने यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील नेत्यांवर गोव्यातील निवडणुकीची महत्त्वाची जबाबदारी टाकण्यात आली असून, पक्षाने तयारीला वेग दिला आहे.
युती आणि प्रचाराची तयारी
गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी सांगितले की, पक्ष सोडून गेलेल्यांमुळे आता पक्ष स्वच्छ झाला आहे आणि आगामी निवडणुकीत काँग्रेस नव्या धोरणासह मैदानात उतरेल. पक्ष सोडून गेलेले काही नेते पुन्हा निवडणूक लढवणार असून, त्यांना गोमंतकीयांनी योग्य धडा शिकवावा, असे आवाहन त्यांनी केले. पक्षाच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर कोणीही पक्षांतर करू नये, यासाठी विशेष योजना तयार करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले की, गोव्यात काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आरजी यांच्यातील युती निश्चित झाली असून, जागावाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात आहेत. येत्या आठ दिवसांत युतीची अधिकृत घोषणा करून प्रचाराला सुरुवात केली जाईल. मडगावातील लोहिया मैदानावर आयोजित संविधान बचाव सभेत चोडणकर बोलत होते. निवडणुकांच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून, सर्वच पक्षांनी हालचाली वेगवान केल्या आहेत.
प्रतिक्रिया व्यक्त करा