अभिनेते उपेंद्र लिमये यांनी जोगवा चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान घडलेला एक प्रसंग एका मुलाखतीत सांगितला आहे. दिग्दर्शक राजीव पाटील यांनी त्यांना दिलेल्या धमकीचा किस्सा त्यांनी सांगितला असून त्या प्रसंगानंतर मिळालेल्या कौतुकाचाही त्यांनी उल्लेख केला आहे.
नाहीतर तुला एक्सपोज करेन
२००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या जोगवा चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत वेगळा ठसा उमटवला होता. अंधश्रद्धा आणि समाजातील एका गंभीर प्रथेवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात उपेंद्र लिमये यांनी तायप्पाची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. मित्र म्हणे या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या भूमिकेच्या तयारीपासून ते राष्ट्रीय पुरस्कार मिळण्यापर्यंतचा प्रवास सांगितला. उपेंद्र लिमये म्हणाले, मला आजही आठवतंय, राजीवने आय ड्रीममध्ये चित्रपट साइन केला आणि तो माझ्या घरी आला. तो मला म्हणाला, जोगवा साइन केली. तुला वाटतं ना तू खूप सॉलिड अॅक्टर आहेस? मलाही वाटतं तू खूप सॉलिड अॅक्टर आहेस. आता मी तुला तायप्पा देतो. करून दाखव. नाहीतर मी तुला एक्सपोज करतो. एक अभिनेता म्हणून तुझ्या किती मर्यादा आहेत, ते दाखवून देतो.
दोन महिन्यांचा सराव आणि राष्ट्रीय पुरस्काराचे भाकीत
तायप्पाची भूमिका साकारण्यासाठी उपेंद्र लिमये यांनी जवळपास दोन महिने सराव केला होता. या चित्रपटाच्या पटकथेमध्ये काही बदल सुचवण्याची मुभाही त्यांना देण्यात आली होती. चित्रपटातील भावनिक प्रसंग आणि क्लोजअप शॉट्ससाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली होती. याच चित्रीकरणादरम्यान घडलेला एक प्रसंग त्यांच्या कायम लक्षात राहिला. उपेंद्र लिमये यांनी सांगितले की, चित्रपटातील एका क्लोजअप शॉटनंतर राजीव पाटील यांनी त्यांचे भरभरून कौतुक केले होते. ते म्हणाले होते, उप्या, यावर्षी तुला नक्कीच राष्ट्रीय पुरस्कार मिळणार. इतका भारी शॉट दुसरा कोणी देऊच शकणार नाही. तू सिनेमात जे काम केलंय, ते कुणीच करू शकत नाही. त्यामुळे राष्ट्रीय पुरस्कार तुलाच मिळाला पाहिजे, नाहीतर माझा पुरस्कारावरचा विश्वास उडेल.
प्रतिक्रिया व्यक्त करा