समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंट या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सीझनमधील एका भागात भुवन बाम आणि मुकेश छाबरा यांच्यातील एक मजेशीर प्रसंग सध्या चर्चेत आहे. या भागात भुवन बाम अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी, मुकेश छाबरा आणि कौस्तुभ अग्रवाल यांच्यासोबत पॅनेलिस्ट म्हणून सहभागी झाला होता. कार्यक्रमादरम्यान स्पर्धक प्रतीक भारद्वाज याने अमिताभ बच्चन यांच्या वेशभूषेत मंचावर प्रवेश केला आणि त्यांचा आवाज, हावभाव तसेच बोलण्याची शैली यांची नक्कल करण्याचा प्रयत्न केला.
शोमधील विनोदाचा क्षण
प्रतीक याचा अभिनय पाहिल्यानंतर भुवन बाम याने स्पर्धकाला मिश्किलपणे विचारले, तुमच्या टॅलेंटला काही रेखा आहे का? या एका वाक्यातून अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्याबाबत अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या विषयाकडे अप्रत्यक्षपणे इशारा करण्यात आला. भुवन यांच्या या टिप्पणीमुळे प्रेक्षकांसह पॅनेलमधील सदस्यांमध्येही हशा पिकला. मात्र, भुवन यांच्या या विनोदावर कास्टिंग डायरेक्टर आणि चित्रपट निर्माते मुकेश छाबरा यांनी लगेच प्रतिक्रिया दिली. त्यांनी भुवन याला मजेशीर अंदाजात सावध करत म्हटले, मित्रा, तुझं फिल्मी करिअर तर आताच सुरू झालं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये पुन्हा एकदा हशा पिकला.
दोघांची जोडी आणि जुनी चर्चा
एका काळात अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतले होते. दोघांनी दो अंजाने, खून पसीना, मुकद्दर का सिकंदर, मिस्टर नटवरलाल, सुहाग, राम बलराम आणि सिलसिला यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. तेव्हापासून दोघांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला. त्या काळात अमिताभ बच्चन यांचे लग्न अभिनेत्री जया बच्चन यांच्यासोबत झाले होते. रेखा यांनी बिग बी यांच्यासोबत असलेल्या नात्याबाबत अनेकदा खुलासा केला, तर अमिताभ बच्चन यांनी यावर कायम मौन बाळगले. आज दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले असले, तरी त्यांच्या नात्यावर आजही चर्चा होतच असते.
प्रतिक्रिया व्यक्त करा