ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी वयाच्या 80 व्या वर्षीही त्याच जोराने काम करताना पाहायला मिळतात. त्यांची नवीन मालिका ‘येतेच मी नांदायला’ ही 30 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेत त्या ठकुबाईच्या भूमिकेत दिसणार आहेत. उषा नाडकर्णी यांना पुन्हा टेलिव्हिजनवर पाहणे ही प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. आता या नव्या मालिकेदरम्यान त्यांनी मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी आपल्या अंत्यसंस्काराबाबत एक धक्कादायक इच्छा व्यक्त केली आहे.
नव्या मालिकेआधीचे वक्तव्य
उषा नाडकर्णी म्हणाल्या, “इंडस्ट्रीत मला मानणारे खूप लोक आहेत, मात्र मी मरताना इंडस्ट्रीतील कोणीच येऊ नये अशी माझी इच्छा आहे.” एका मीडिया टॉकशी बोलताना त्या म्हणाल्या, “माझ्याबद्दल वाटेल तसे बोलतात, मला सगळं माहिती आहे सगळ्यातलं, मला हेही माहित आहे की मला न मागता अनेक काम मिळाली आहेत, माझी कामं चांगली होतात असं लोकांकडून कळते.” मागील वर्षी त्यांनी तीन चित्रपट केले, गांधी टॉक्स, तुंबाडची मंजुळा आणि महाराष्ट्र फाईल्स. यामुळे त्यांना काहीही न करता कामं मिळाली, असे त्या म्हणाल्या.
माझं कामच बोलतं
उषा नाडकर्णी म्हणाल्या की त्यांच्या एक्स्ट्रा करिक्युलर अॅक्टिव्हिटीही नसतात की ज्यामुळे त्यांना कामं मिळतील. “मी नोकरी करून माझं काम करत होते जेणेकरून मला कोणाला शुभ सकाळ बोलायची गरज नव्हती, किंवा कोणाला सलामही करायला लागला नाही. मी नेहमी बोलते, माझं काम बोलतं. माझ्याबद्दल जे लोक बोलतात त्या बिचाऱ्यांकडे काम नाहीत, ते घरी बसलेले आहेत,” असे त्या म्हणाल्या. नव्या मालिकेत त्या ठकुबाईच्या भूमिकेत दिसणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा