पीएम किसान सन्मान निधी योजनेतंर्गत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी 6,000 रुपये मिळतात. तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतात. मात्र आता या योजनेचा हप्ता वाढवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही मागणी करण्यात येत आहे. साधारणपणे केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी अशी मागणी केली जाते. यंदा मात्र वर्षाअखेरीस याविषयीची चर्चा समोर येत असल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
## हप्ता वाढवण्याची मागणी का?
बी-बियाण्यांच्या वाढत्या किंमती, खतं, कीटकनाशकं आणि शेतीशी संबंधित इतर साहित्य महागल्याने हप्ता वाढवण्याची मागणी होत आहे. शेतीचा खर्च सातत्याने वाढत आहे. बी-बियाणे, खतं, कीटकनाशकं आणि कृषी यंत्रासाठी शेतकऱ्यांना पूर्वीपेक्षा अधिक खर्च येत आहे. अशात पीएम किसान योजनेतंर्गत मिळणारी आर्थिक मदत तुटपुंजी असल्याचा दावा भारतीय किसान संघाने केला आहे. भारतीय किसान संघाने केंद्र सरकारकडे पीएम किसान योजनेसाठी बजेट वाढवून देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे या मागणीला विशेष महत्त्व आलं आहे.
संघटनेने 2027-28 वर्षासाठीच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे 17 मागण्यांचा प्रस्ताव सादर केला आहे. यामध्ये केवळ पीएम किसान योजनाच नाही, तर सरकारी खरेदी, देशी पशूपालनाला चालना आणि जैविक खताला प्रोत्साहन देण्याची मागणीही करण्यात आली आहे. मात्र किती बजेट वाढवावं आणि हप्ता किती वाढवावा, याविषयीची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
## कोणाला मिळत नाही लाभ?
या योजनेच्या अटींनुसार, एखाद्या आर्थिक वर्षात आयकर भरणाऱ्या कुटुंबातील व्यक्तीला योजनेचा लाभ देण्यात येत नाही. ज्यांचं निवृत्तीवेतन दरमहा 10 हजार रुपयांहून अधिक असेल, अथवा जे केंद्र किंवा राज्य सरकारच्या सेवेतील निवृत्त अधिकारी किंवा कर्मचारी असतील, अशा कुटुंबातील सदस्यालाही या योजनेचा लाभ मिळत नाही. डॉक्टर, वकील, अभियंता, सीए अथवा व्यवसाय करणाऱ्यांनाही पीएम किसान योजनेचा लाभ देण्यात येत नाही. हप्ता वाढीवर केंद्र सरकार काय निर्णय घेतं, याकडे आता शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा