व्यवसाय सुरू केला म्हणजे प्रत्येक वेळी यश मिळेलच, असं नसतं. कधी परिस्थिती साथ देत नाही, तर कधी व्यवसायाचं गणित बिघडतं. मात्र योग्य वेळी योग्य निर्णय घेतला, तर अडचणीतूनही मोठी संधी उभी राहू शकते. बंगळुरूमधील एका जोडप्याने नेमकं तेच करून दाखवलं आहे.
एकेकाळी दुग्धव्यवसायात अडचणींचा सामना करणाऱ्या श्वेता आणि विश्वनाथ यांनी आज मिठाई आणि फरसाणाचा मोठा व्यवसाय उभा केला आहे. त्यांच्या इंडिया स्वीट हाऊस या ब्रँडची आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील वार्षिक उलाढाल ८३.१० कोटी रुपये झाली आहे.
दुग्धव्यवसायाची सुरुवात आणि अडचणी
श्वेता आणि विश्वनाथ यांनी २०१५-१६ च्या सुमारास सेंद्रिय शेती आणि दुग्धव्यवसाय सुरू केला होता. त्यांनी २० एकरांवर शेती उभी केली आणि जवळपास १०० गायींचं संगोपन केलं. कर्मा फार्म्स या नावाने ते दूध, पनीर आणि तूप विकत होते. शेतातील ताज्या दुग्धजन्य पदार्थांच्या माध्यमातून टिकाऊ व्यवसाय उभा करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
मात्र कोरोना महामारीमुळे त्यांच्या व्यवसायाचं गणित बिघडलं. ताज्या दुधाची मागणी आणि पुरवठा सांभाळणं कठीण झालं. निर्बंध आणि वाहतुकीच्या अडचणींमुळे ग्राहकांपर्यंत थेट उत्पादनं पोहोचवणं अवघड झालं. त्यात काचेच्या बाटल्या ग्राहकांकडून परत गोळा करणंही आव्हानात्मक ठरलं. या परिस्थितीत व्यवसाय बंद करण्याऐवजी त्यांनी उपलब्ध दुधाचा वेगळ्या पद्धतीने वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यातून पारंपरिक भारतीय मिठाई बनवण्याचे प्रयोग सुरू झाले.
मिठाईपासून ५० हून अधिक दुकानांपर्यंत
या प्रयोगातून २०२० मध्ये इंडिया स्वीट हाऊस या ब्रँडचा जन्म झाला. सुरुवातीला त्यांनी ऑनलाईन माध्यमातून मिठाई विकण्यावर भर दिला. बिगबास्केट, मेट्रो कॅश अँड कॅरी आणि स्पार इंडिया यांसारख्या माध्यमांवरून त्यांची उत्पादनं ग्राहकांपर्यंत पोहोचू लागली. त्यामुळे ग्राहकांना कोणत्या प्रकारची मिठाई आवडते, याचा अंदाज घेण्यास त्यांना मदत झाली. यानंतर बंगळुरूच्या मल्लेश्वरम भागात त्यांनी पहिलं दुकान सुरू केलं.
हळूहळू त्यांच्या उत्पादनांमध्ये मुरुक्कू, चिप्स, कुकीज, स्नॅक्स आणि इतर पारंपरिक पदार्थांचा समावेश झाला. आज इंडिया स्वीट हाऊसची ५० हून अधिक दुकानं सुरू झाली आहेत. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये कंपनीने ८३.१० कोटी रुपयांची उलाढाल केली. याच काळात कंपनीचा ईबीआयटीडीए ६.१५ कोटी रुपये, तर निव्वळ नफा १.८३ कोटी रुपये होता.
प्रतिक्रिया व्यक्त करा