कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला आहे. दूध डेअरी चालवायची असेल तर मुख्यमंत्रीपद सोडा आणि दूध विकत बसा, असे दिपके म्हणाले. गोकुळच्या निवडणुकीवरून त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. त्यांनी अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वरमध्ये दुष्काळी पाहणी दौरा केला आणि त्यानंतर सरकारवर निशाणा साधला.
दुष्काळी स्थितीची पाहणी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात अभिजीत दिपके यांनी दुष्काळी परिस्थितीचा दौरा करत शेतीतील पिकांची पाहणी केली. यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांनी दुष्काळी स्थितीवरून सरकारवर जोरदार टीका केली. इंडिया आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा असल्याच्या प्रश्नावर दिपके यांनी बोलणे टाळले.
सत्ताधारी आणि विरोधकांवरील विश्वास उडाला
या सर्व घडामोडींमुळे सर्वसामान्य जनतेचा सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या दोघांवरील विश्वास उडाला आहे, असे दिपके म्हणाले. संपूर्ण राजकारण केवळ पक्षांच्या स्वार्थाभोवती केंद्रित झाल्याचे चित्र असल्याचे त्यांनी सांगितले. भीषण दुष्काळाची स्थिती असतानाही सत्ताधारी आणि विरोधकांना सर्वसामान्यांशी व त्यांच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही, असा आरोप त्यांनी केला. कोणासोबत आघाडी किंवा युती करायची, उमेदवार कुठे पाठवायचे आणि कोणाचे किती आमदार फोडायचे किंवा हायजॅक करायचे, यातच सर्व शक्ती खर्ची घातली जात आहे, असेही दिपके म्हणाले. या स्वार्थी राजकारणामुळे जनतेचे प्रत्यक्ष प्रश्न सुटणार आहेत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
प्रतिक्रिया व्यक्त करा