केंद्र सरकारने लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या फेररचनेसाठी १३२ व्या घटनादुरुस्ती विधेयकावर विचार करण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांची बैठक बोलावली आहे. हे विधेयक मंजूर करण्यासाठी लोकसभेतील दोन तृतीयांश खासदारांचा पाठिंबा आवश्यक असतो. या विधेयकाबाबत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका अद्याप ठरलेली नाही. मात्र त्याआधीच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पक्षाच्या भूमिकेवर टीका केल्याने वाद निर्माण झाला आहे.
भूमिका ठरण्याआधीच टीका कशी? मोहिते पाटलांचा सवाल
माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भूमिका ठरण्याच्या अगोदर टीका कशी केली जाऊ शकते, असा सवाल केला आहे. पक्षाच्या आठ खासदारांची एकत्र बैठक अद्याप झालेली नाही आणि अधिकृतपणे काहीही ठरलेले नाही, त्याआधीच टीका सुरू झाली आहे, असे ते म्हणाले. खासदार अमोल कोल्हे यांनी पक्षाची भूमिका मांडली आहे. पक्षाच्या नेत्यांचा अपमान होत असेल तर ते चुकीचे आहे, असेही मोहिते पाटील म्हणाले. बैठक झालेली नाही, चर्चा झालेली नाही, मते जाणून घेतलेली नाहीत; जनभावना पक्षाच्या नेत्यांसमोर मांडून त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
विजय वडेट्टीवार यांनी केलेली टीका काँग्रेसची संस्कृती नाही आणि ती चुकीच्या पद्धतीने करण्यात आली आहे, असेही मोहिते पाटील म्हणाले. या विषयावर अमोल कोल्हे सविस्तरपणे बोलले आहेत. भावनेच्या भरात अनेकजण बोलत आहेत, असेही ते म्हणाले. पक्षाच्या नेत्यांसमोर जमिनीवरील स्थिती मांडली जाईल आणि इतर पक्षांच्या नेत्यांनी पक्षाच्या आठ खासदारांशी संपर्क साधलेला नाही, असेही त्यांनी सांगितले.
रविवारी रात्री खासदारांची बैठक, मग निर्णय
सर्व खासदार रविवारी रात्री दिल्लीत पोहोचत असून रविवारी रात्री किंवा सोमवारी सकाळी खासदारांची बैठक होईल. या बैठकीत परिसीमन विधेयकाबाबत आपली मते मांडणार असल्याचे मोहिते पाटील यांनी सांगितले. सर्व खासदारांचा विचार लक्षात घेऊनच पक्षाकडून याबाबत निर्णय घेतला जाईल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संसदेत येणाऱ्या कोणत्याही विधेयकाचा बारकाईने अभ्यास करतो, असे खासदार निलेश लंके म्हणाले. परिसीमन विधेयकाचाही अभ्यास करून त्यातील बारकावे शोधले जातील आणि त्यानंतर पवारसाहेब आणि ताईंच्या नेतृत्वाखाली खासदारांची बैठक घेऊन निर्णय जाहीर केला जाईल. तोरणा किल्ल्यावरील पूर्वनियोजित मोहिमेमुळे आपल्याला बैठकीला जाणे शक्य नसल्याचेही लंके यांनी सांगितले. काँग्रेस आणि शिवसेनेने नाराज होण्याचे कारण नाही, कारण पक्षाने अजून निर्णयच घेतलेला नाही, असेही ते म्हणाले.
प्रतिक्रिया व्यक्त करा