महिला आरक्षण आणि मतदारसंघांची पुनर्रचना या मुद्द्यांवर केंद्र सरकारने पुन्हा तयारी सुरू केली आहे. यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याचा प्रस्ताव सरकारने मांडला आहे. या अधिवेशनात महिला आरक्षणाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयक पुन्हा संसदेत मांडले जाऊ शकते.
३० नोव्हेंबरपासून विशेष अधिवेशन
प्रस्तावानुसार, लोकसभेचे कामकाज ३० नोव्हेंबरपासून सुरू होईल, तर राज्यसभेचे कामकाज २ डिसेंबरपासून सुरू करण्याचे नियोजन आहे. सरकारी कामकाज किती आहे, यानुसार संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज ३ डिसेंबर रोजी संपण्याची शक्यता आहे. या अधिवेशनापूर्वी शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार असून, त्या बैठकीत विधेयकावर चर्चा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली. विशेष अधिवेशनासाठी लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेच्या सभापतींकडे विनंती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
लोकसभेच्या जागा वाढणार, ३३ टक्के आरक्षण
प्रस्तावित घटनादुरुस्ती विधेयकात लोकसभेच्या जागा वाढवण्याची तरतूद करण्यात आली आहे. सध्या लोकसभेत ५४३ जागा आहेत. ही संख्या वाढवून कमाल ८५० करण्याचा सरकारचा विचार आहे. मतदारसंघांची नव्याने रचना करून जागांची संख्या वाढवली जाणार आहे. या बदलानंतर लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याची सरकारची योजना आहे. २०२९ मध्ये होणाऱ्या निवडणुकांपूर्वी महिला आरक्षण लागू करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यातही सरकारने हे विधेयक संसदेत मंजूर करून घेण्याचा प्रयत्न केला होता. पण आवश्यक तेवढ्या खासदारांचे समर्थन न मिळाल्याने घटनादुरुस्ती विधेयक मंजूर होऊ शकले नव्हते. घटनादुरुस्ती विधेयक मंजूर होण्यासाठी लोकसभेत दोनतृतीयांश बहुमत आवश्यक असते. सध्या लोकसभेची एकूण सदस्यसंख्या ५४३ आहे. त्यामुळे हे विधेयक मंजूर करण्यासाठी ३६१ खासदारांच्या मतांची गरज आहे. लोकसभेच्या तीन जागा सध्या रिक्त आहेत, त्यामुळे प्रत्यक्षात सभागृहात ५४० खासदार आहेत. सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे सध्या सुमारे ३२० खासदार आहेत. त्यामुळे द्रमुकचे २२ खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आठ खासदार यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते.
प्रतिक्रिया व्यक्त करा