डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने गुरुवारी शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याच महिन्यात तिसऱ्यांदा ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला असला तरीही पवार कामात सक्रिय आहेत. काल जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतली. दरम्यान, केंद्र सरकारने चार दिवसीय संसद अधिवेशन बोलावले आहे. ३० नोव्हेंबर रोजी लोकसभा तर २ डिसेंबर रोजी राज्यसभेचे अधिवेशन सुरू होणार आहे. यामुळे मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण बिल मंजूर होण्याची शक्यता आहे. सरकार या अधिवेशनाच्या माध्यमातून बहुमताची चाचपणी करत आहे. विरोधी बाकांवरील काही घटक पक्षांचे मन वळवण्यात सरकारला यश आले आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
दोन्ही राष्ट्रवादीत हालचाली वाढल्या
दोन्ही राष्ट्रवादीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची काल बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार यांच्यासह पक्षाचे अनेक नेते त्याला उपस्थित होते. रोहित पवार यांच्या ट्रॅक्टर मोर्चाविषयी पक्षाची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यापूर्वी रोहित पवार यांच्या नागपूरमधील गोपनीय बैठकीचीही चर्चा रंगली होती. दुसरीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या मंत्र्यांची देवगिरीवर बैठक घेतल्याची माहिती समोर येत आहे.
राज ठाकरे कल्याण-डोंबिवली दौऱ्यावर; पावसाचा अलर्ट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्यापासून कल्याण-डोंबिवली दौऱ्यावर आहेत. २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी ते मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. कल्याण आणि डोंबिवली शहरातील पक्ष संघटनेच्या कामाचा आढावा ते घेतील. दरम्यान सध्याच्या राजकीय घडामोडींवर ते काय भाष्य करणार याकडे सर्वांचे लक्ष असेल. उत्तरेकडील वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. सांगली आणि कोल्हापूरसह काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा