संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या तयारीदरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतराच्या चर्चांना वेग आला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातील काही खासदार भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची भूमिका तुलनेने अनुकूल दिसत असल्याने, या पक्षातील काही खासदारही भाजपच्या संपर्कात गेल्याचे सांगितले जात आहे.
पक्षांतरासाठी घटनात्मक संरक्षणाची मागणी
सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सुमारे पाच खासदार भाजप नेत्यांच्या थेट संपर्कात आहेत. या खासदारांकडून राजकीय संरक्षणाची मागणी केली जात आहे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेतृत्वाची भाजपशी थेट चर्चा झाली, तर आपल्याला काहीच मिळणार नाही, अशी भीती या खासदारांना वाटत असल्याचे सांगितले जात आहे.
त्यामुळे भाजपला साथ देण्यास तयार असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या खासदारांना पक्षांतरासाठी घटनात्मक संरक्षण हवे आहे. तृणमूल काँग्रेसमधील बंडखोर खासदारांसारखी आपली अवस्था होऊ नये, अशी त्यांची भूमिका असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
विकासकामांसाठी निधीचा मुद्दा
दरम्यान, काँग्रेसचेही काही खासदार भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. आपल्या मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याची तक्रार या खासदारांनी केली आहे. निधी मिळविताना जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
राजकारणासाठी मतदारसंघात विकासकामे करणे आवश्यक आहे, मात्र सरकारच्या मंजुरीशिवाय निधी मिळू शकत नाही. त्यामुळे विकासकामे रखडल्यास राजकीय अस्तित्वावर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत भाजपशी जुळवून घेणे ही आपली मजबुरी असल्याचे या खासदारांना वाटत असल्याचे सांगितले जात आहे.
पावसाळी अधिवेशन अद्याप संस्थगित करण्यात आलेले नाही. या सर्व बाबी सूत्रांच्या माहितीवर आणि चर्चांवर आधारित आहेत.
प्रतिक्रिया व्यक्त करा