, २७ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

राज्यातील ७ कोटी फ्लॅटना स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड मिळणार

महाराष्ट्रातील प्रत्येक सदनिकेसाठी स्वतंत्र मालमत्ता पत्रिका तयार करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. याचा लाभ सुमारे ७ कोटी सदनिकाधारकांना होणार आहे.

राज्यातील ७ कोटी फ्लॅटना स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड मिळणार

महाराष्ट्रातील प्रत्येक सदनिकेसाठी स्वतंत्र मालमत्ता पत्रिका तयार करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. या नवीन व्यवस्थेला व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड असे नाव देण्यात आले आहे. या व्यवस्थेमुळे सदनिकेचे क्षेत्रफळ, मालकी हक्क, त्यावरील बोजे आणि कायदेशीर अडचणींची नोंद स्वतंत्रपणे उपलब्ध होणार आहे. राज्यातील सुमारे ७ कोटींहून अधिक सदनिकाधारकांना या उपक्रमाचा लाभ होणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, ग्रामीण भागात जमिनीच्या हक्कांची नोंद सातबारा उताऱ्यात, तर शहरी भूमापन क्षेत्रात मालमत्ता पत्रिकेत केली जाते. मात्र इमारतीतील प्रत्येक सदनिकेच्या स्वतंत्र हक्कांच्या नोंदीसाठी राज्यभर एकसमान व्यवस्था नाही. ही उणीव दूर करण्यासाठी नवीन व्यवस्था लागू करण्यात येणार आहे. या व्यवस्थेसाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मध्ये सुधारणा करण्यात येणार असून, नियमावलीचा मसुदा हरकती आणि सूचनांसाठी खुला करण्यात आला आहे. प्राप्त हरकती आणि सूचनांचा विचार करून नियमांना अंतिम स्वरूप दिले जाईल.

नवी व्यवस्था कशी असणार?

या व्यवस्थेत सर्वप्रथम इमारत आणि तिच्या सामायिक जागांची मुख्य नोंद केली जाईल. त्यानंतर प्रत्येक सदनिकेसाठी स्वतंत्र पूरक नोंद होईल. शहरी भूमापन क्षेत्रात इमारतीसाठी डी-१ आणि प्रत्येक सदनिकेसाठी डी-२ अशी नोंद प्रस्तावित आहे. ग्रामीण तसेच अन्य क्षेत्रांत इमारतीसाठी आय-ए (गाव नमुना ७-क) आणि सदनिकेसाठी आय-बी (गाव नमुना ७-ड) अशी नोंद होणार आहे.

प्रत्येक सदनिकेचा क्रमांक, धारकाचे नाव, मंजूर क्षेत्रफळ, संबंधित हक्क, बोजे आणि इमारतीच्या मंजूर आराखड्यातील क्षेत्रफळ व मोकळ्या जागेचा तपशील मालमत्ता पत्रिकेत असेल. प्रत्येक फ्लॅटला स्वतंत्र ओळख क्रमांक असेल. मंजूर बांधकाम आराखडा, संबंधित प्रमाणपत्रे व नोंदणीकृत दस्तऐवजांची पडताळणी करून नोंदी होतील. नवीन बांधकाम प्रकल्पांसाठी सक्षम नियोजन प्राधिकरणाने दिलेल्या प्रारंभ प्रमाणपत्राआधारे, तर अस्तित्वातील इमारतींसाठी भोगवटा प्रमाणपत्र आणि नोंदणीकृत दस्तऐवजांआधारे नोंदी प्रस्तावित आहेत.

अर्ज आणि नोंदणीची प्रक्रिया

जमीनमालक, प्रवर्तक, विकासक, सदनिकाधारक किंवा सोसायटी अथवा संस्थेचा अधिकृत प्रतिनिधी मालमत्ता पत्रिकेसाठी अर्ज करू शकेल. अर्जासोबत मूळ हक्क नोंद, मंजूर बांधकाम आराखडा, आवश्यक प्रमाणपत्रे, हस्तांतरणपत्र किंवा अभिहस्तांतरणपत्र आणि सदनिकेच्या हक्कांशी संबंधित नोंदणीकृत दस्तऐवज सादर करावे लागतील.

बँकेचे कर्ज, गहाणखत, न्यायालयीन निर्बंध तसेच सरकारी देणी यांची नोंदही सदनिकानिहाय करण्याची तरतूद प्रस्तावित आहे. यासाठी लागू प्रक्रियेनुसार सक्षम प्राधिकरणाचे आदेश किंवा विश्वसनीय माहितीच्या आधारे नोंदी केल्या जातील. अर्ज स्वीकारणे, माहिती संकलित करणे, आवश्यकतेनुसार जागेची पडताळणी, त्रुटींची पूर्तता, नोंदींना मान्यता आणि डिजिटल स्वाक्षरीसह मालमत्ता पत्रिका वितरित करणे अशी एकात्मिक डिजिटल व्यवस्था होणार आहे. नोंदणी व मुद्रांकसह संबंधित विभागांत मुदतीत माहितीची देवाणघेवाण करण्याची तरतूदही असेल.

अभी जाधव

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance