देशभरातील ८ कोटींहून अधिक ईपीएफओ सदस्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. भविष्य निर्वाह निधीची रक्कम काढण्याची प्रक्रिया आता पूर्वीपेक्षा खूपच सोपी आणि वेगवान होणार आहे. येत्या काळात युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसच्या माध्यमातून थेट पीएफचे पैसे काढता येणार आहेत.
युपीआय सुविधा कशी काम करणार
पुढील महिन्यात, वर्षाअखेर ही सुविधा सुरू होऊ शकते. युपीआयद्वारे पैसे काढण्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे. किमान एक हजार रुपये काढावे लागतील. कमाल मर्यादा मात्र पीएफच्या नियमांनुसारच राहील. सदस्यांनी अगदी लहान रक्कमेसाठी वारंवार विनंती करू नये, यासाठी ही किमान मर्यादा ठेवण्यात आली आहे. या सुविधेची तांत्रिक तयारी पूर्ण झाली असून, दोन चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. चाचणीत आढळलेल्या किरकोळ तांत्रिक त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. ही सुविधा सुरुवातीला भीम अॅपवर उपलब्ध होईल आणि ती सदस्याच्या यूएएन क्रमांकाशी जोडलेली असेल. खात्यात किती रक्कम शिल्लक आहे, किती शिल्लक ठेवावी लागेल आणि किती काढता येईल, याची माहिती लगेच मिळेल.
क्लेम सेटलमेंट तीन दिवसांत पूर्ण होणार
ईपीएफओ ३.० प्रकल्पांतर्गत मोठे डिजिटल बदल होत आहेत. सेंट्रलाईज्ड आयटी इनेबल्ड सिस्टिम २.० हे नवे तंत्रज्ञान व्यासपीठ लवकरच कार्यान्वित होईल. कोअर बँकिंगसारख्या सुविधा मिळणार असून, कागदपत्रांची पडताळणी मानवी हस्तक्षेपाशिवाय आपोआप आणि झटपट पूर्ण होईल. त्यामुळे क्लेम सेटलमेंटचा कालावधी तीन दिवसांपेक्षाही कमी होण्याची अपेक्षा आहे. सध्या पोर्टलवर क्लेम केल्यानंतर एखाद्या चुकीमुळे खात्यात रक्कम जमा होण्यास आठवडा ते दोन आठवडे लागतात. यापूर्वी पीएफमधून केवळ २५ टक्के आंशिक रक्कम काढता येत होती आणि ७५ टक्के रक्कम खात्यात ठेवावी लागत होती. १९ नोव्हेंबरला झालेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा नियम बदलण्यात आला असून, आता ९० टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येणार आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा