हिवाळ्यात गरमागरम, मऊ आणि जाळीदार इडली खाण्याची मजा वेगळीच असते. मात्र थंडीच्या दिवसांत इडलीचे पीठ व्यवस्थित आंबत नसल्यामुळे इडल्या कडक आणि जड होतात. कमी तापमानामुळे पिठातील नैसर्गिक क्रिया मंदावते. अशा वेळी काही सोप्या घरगुती उपायांनी थंडीतही पीठ छान फुलवता येते.
पीठ आंबवण्यासाठी ‘हे’ उपाय करा
पीठ दळताना अतिथंड पाण्याऐवजी किंचित कोमट पाणी वापरा. यामुळे पिठाचे तापमान योग्य राहते आणि आंबण्याची प्रक्रिया सुरळीत होते. मात्र पाणी जास्त गरम नसावे. थंडीत पीठ उबदार ठिकाणी ठेवणे महत्त्वाचे आहे. बंद मायक्रोवेव्ह किंवा ओव्हनमध्ये (बंद अवस्थेत) किंवा एखाद्या उबदार कोपऱ्यात भांडे ठेवल्याने चांगला परिणाम मिळतो. उडीद डाळ भिजवताना त्यात एक ते दोन चमचे मेथीदाणे घाला. मेथीदाण्यांमुळे पिठाला चांगला पोत मिळतो आणि आंबण्याच्या प्रक्रियेला मदत होते. त्यामुळे इडल्या अधिक मऊ आणि हलक्या होतात.
प्रमाण, वेळ आणि मिठाचे नियोजन
तांदूळ आणि उडीद डाळ यांचे प्रमाण योग्य असणे गरजेचे आहे. साधारण 3:1 किंवा 4:1 या प्रमाणात दोन्ही पदार्थ घेतल्यास पिठाचा पोत चांगला राहतो आणि इडल्या छान फुलतात. उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात पीठ आंबायला जास्त वेळ लागतो. त्यामुळे घाई न करता साधारण 10 ते 14 तास पीठ आंबण्यासाठी ठेवा. भांड्यावर झाकण ठेवा, पण पीठ फुलण्यासाठी त्यात पुरेशी जागा असू द्या. थंडीत पीठ आंबण्यास अडचण येत असेल तर मीठ पीठ आंबल्यानंतर घाला. जास्त प्रमाणातील मीठ आंबण्याची प्रक्रिया मंदावू शकते. योग्य वेळी मीठ घातल्यास आंबण्याची प्रक्रिया चांगली होते.
प्रतिक्रिया व्यक्त करा