मुंबईत २७ नोव्हेंबर २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागरी निवारा परिषदेअंतर्गत सहकारी गृहनिर्माण संस्थांचे वर्ग-१ रूपांतरण आदेश वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागरी निवारा परिषदेचे कौतुक केले. तसेच मुंबईतील मराठी माणूस मुंबईतच राहावा यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे प्रतिपादन त्यांनी केले.
६२५ कुटुंबांना घरे; १६०० प्रकल्प पूर्ण
नागरी निवारा परिषद हा कायदा गरिबांना घर मिळावे यासाठी करण्यात आला होता, मात्र त्याचा गैरवापरही झाला, असे फडणवीस म्हणाले. तरीही त्याकाळात काही चांगली उदाहरणे घडली. त्याअंतर्गत ६२५ कुटुंबांना घरे मिळाली, हे आपले स्वप्न होते, असे ते म्हणाले. निर्णय घेतल्यानंतर मुंबईमध्ये १६०० प्रकल्प झाले. जो मुंबईतला माणूस ३००-३५० चौरस फूट घरात राहत होता, त्याला १२०० चौरस फुटाचे घर मिळाले. घरांच्या चाव्या देताना प्रत्यक्ष घरे पाहिली तेव्हा हे लक्षात आले, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाचे कौतुक केले.
बीडीडी चाळ: देशातील सर्वात मोठा नागरी प्रकल्प
दक्षिण मुंबईतील गिरणी कामगार वसई, विरार आणि कर्जतपर्यंत गेले, पण आजच्या निर्णयामुळे या सर्व वसाहती त्याच ठिकाणी विकसित केल्या जात आहेत, असे फडणवीस म्हणाले. बीडीडी चाळ हा भारतातील सर्वात मोठा नागरी प्रकल्प आहे. त्यामध्ये १२० चौरस फुटात राहणाऱ्या प्रत्येक मुंबईकराला साडेचारशे ते सहाशे चौरस फुटाचे घर मोफत त्याच ठिकाणी दिले जात आहे. त्यांच्या जीवनात परिवर्तन करण्याचे काम सरकारने केले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबईला मुंबई म्हणून ओळख देणाऱ्या वसाहतींमधील लोकांना उत्तम जीवन मिळावे, असा प्रयत्न सरकारने केला आहे. पुढच्या काळात याची मोठ्या प्रमाणात मोहीम राबवून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत. हे जनतेचे आहे आणि ते जनतेला परत करायचे आहे, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आशिष शेलार यांचेही कौतुक केले.
प्रतिक्रिया व्यक्त करा