देशाचे माजी सरन्यायाधीश बी आर गवई यांनी कोलेजियम म्हणजे न्यायवृंद प्रणालीवर गंभीर आक्षेप घेत थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिले आहे. या पत्राची प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनाही पाठवण्यात आली आहे. कोलेजियमने अलिकडे शिफारस केलेले न्यायाधीश सर्व एकाच समुदायातून येतात, असा आक्षेप गवई यांनी पत्रात नोंदवला आहे. त्यामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक, महिला तसेच योग्य उमेदवार वंचित राहात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रपतींनी यात लवकरात लवकर हस्तक्षेप करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
पत्रात कोणती आकडेवारी दिली आहे
गवई यांनी पत्रात संसदेत सादर करण्यात आलेली आकडेवारी दिली आहे. त्यानुसार २०१८ सालापासून आतापर्यंत देशातील वेगवेगळ्या उच्च न्यायालयांत नियुक्त केलेल्या एकूण ७१५ न्यायाधीशांपैकी फक्त २२ अनुसूचित जाती, १६ अनुसूचित जमाती, ८९ अन्य मागास वर्ग आणि ३७ अल्पसंख्याक समुदायातील आहेत. याच पत्रातील माहितीनुसार २०२१ ते २०२६ या काळात झालेल्या नियुक्त्यांपैकी ८० टक्के पदे सामान्य प्रवर्गाच्या वाट्याला आली आहेत. यात ओबीसींना १४ टक्क्यांपेक्षा कमी प्रतिनिधित्व मिळाले आहे. देशातील एकूण लोकसंख्येत ५ टक्क्यांपेक्षाही कमी प्रमाण असलेल्या एका विशिष्ट समुदायाकडे सर्वोच्च न्यायालयाच्या ४० टक्क्यांहून अधिक जागा आहेत, असाही दावा गवई यांनी पत्रात केला आहे.
पदोन्नती आणि बदल्यांवरही आक्षेप
गवई यांनी न्यायाधीशांची पदोन्नती आणि बदलीचे निकष यावरही पत्रात आक्षेप नोंदवला आहे. विशेष म्हणजे, मी कार्यरत असताना अशा कोलेजियमचा भाग होतो, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांच्या पत्राची राष्ट्रपती आणि सरकार काय दखल घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा