चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची वाढती संख्या आणि मानव-वन्यजीव संघर्षाचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाघांच्या हल्ल्यांमध्ये नागरिकांचे तसेच पाळीव प्राण्यांचे बळी जात असल्याने आता वाघांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर वनविभागाने वाघांच्या नसबंदीसाठी केंद्र सरकारकडे विशेष परवानगी मागितल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
देशातील पहिला प्रस्ताव असल्याचा दावा
मिळालेल्या माहितीनुसार, वाघांच्या नसबंदीसाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागणारा चंद्रपूर हा देशातील पहिला आणि एकमेव जिल्हा असल्याचा दावा केला जात आहे. वनविभागाकडून यासंदर्भात सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे वाघांची वाढती संख्या रोखण्यासाठी वनविभाग आता नसबंदीचा पर्याय गांभीर्याने विचारात घेत असल्याचे स्पष्ट होत आहे.
शेतकऱ्यांचा मोर्चा आणि वनविभागाचा खुलासा
या प्रश्नावरून भाजपच्या ज्येष्ठ नेत्या, राज्याच्या माजी मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू शोभाताई फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी मुल तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना सोबत घेत थेट चंद्रपूर वनविभागाच्या मुख्यालयावर धडक दिली. वाघांच्या वाढत्या संख्येमुळे शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली. वाघांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासोबतच वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांपासून नागरिकांचे संरक्षण, शेतकऱ्यांचे नुकसान आणि पाळीव प्राण्यांच्या मृत्यूचा प्रश्न यांसह विविध मागण्या यावेळी वनविभागासमोर मांडण्यात आल्या. केवळ आश्वासनांवर न थांबता ठोस उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली. यावेळी चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक रामानुजन यांनी उपस्थितांना उत्तर देताना वाघांच्या नसबंदीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात आल्याचा महत्त्वाचा खुलासा केला. या प्रस्तावाला केंद्राची परवानगी मिळाल्यानंतरच पुढील कार्यवाहीबाबत निर्णय होऊ शकेल. एकीकडे वाघांचे संवर्धन आणि दुसरीकडे मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्याचे आव्हान वनविभागासमोर आहे. त्यामुळे चंद्रपूरमधील वाघांच्या नसबंदीच्या प्रस्तावावर केंद्र सरकार काय निर्णय घेणार, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा