हिंदू धर्मशास्त्रात वास्तुशास्त्राला मोठे महत्त्व दिले जाते. घर कसे असावे, त्याची रचना कशी असावी, मुख्य दरवाजाचे तोंड कोणत्या दिशेला असावे आणि बेडरूम कोणत्या दिशेला असावी, याबद्दल वास्तुशास्त्रात सविस्तर माहिती दिली आहे. घरातील सर्वांत महत्त्वाचे स्थान म्हणजे स्वयंपाकघर. आपण स्वयंपाकघरात अन्न तयार करतो आणि त्या अन्नातूनच आपल्याला ऊर्जा मिळते. त्यामुळे स्वयंपाकघर हे घरातील ऊर्जेचा सर्वांत मोठा स्रोत मानले जाते. मात्र, घरात वास्तुदोष निर्माण झाला, तर नकारात्मक ऊर्जेचा सामना करावा लागतो. दैनंदिन आयुष्यात आपण काही छोट्या चुका करतो, ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर कसे असावे आणि त्यातील वस्तू कोणत्या दिशेला ठेवाव्यात, याची माहिती जाणून घेऊया.
स्वयंपाकघराची रचना अशी असावी
वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघराची रचना अशी असावी की तिथे नेहमी हवा खेळती राहील. त्यासाठी पुरेशा खिडक्यांची व्यवस्था असावी. एखाद्या कोंदट ठिकाणी स्वयंपाकघर कधीही असू नये. किचन ओटा नेहमी अग्नेय दिशेलाच असावा. अग्नेय दिशा ही अग्नीदेवतेची दिशा मानली जाते. त्यामुळे स्वयंपाकघर अग्नेय दिशेला असणे शुभ मानले जाते. स्वयंपाकघरात ठेवल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूची एक निश्चित दिशा ठरलेली असते. एखादी वस्तू चुकीच्या ठिकाणी ठेवली, तर त्यामुळेही घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
या गोष्टी टाळा
स्वयंपाकघरात काही विशिष्ट भांडी अशी असतात, जी कधीही उलटी ठेवू नयेत. त्यामध्ये कढई आणि चाकूसारख्या धारदार वस्तूंचा समावेश होतो. अशी भांडी उलटी ठेवल्याने घरात वास्तुदोष निर्माण होतो, असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे. त्यामुळे स्वयंपाकघरातील वस्तू योग्य पद्धतीने आणि योग्य दिशेला ठेवण्याकडे लक्ष द्यावे. घरातील रचना योग्य असेल, तर घरात सकारात्मक ऊर्जा राहते, असे वास्तुशास्त्रात मानले जाते. (ही माहिती उपलब्ध स्रोतांवर आधारित आहे. यातील तथ्यांबद्दल कोणताही दावा केला जात नाही.)
प्रतिक्रिया व्यक्त करा