पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवार अजित पवार यांच्याप्रमाणे काम करत नाहीत, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यांच्या या वक्तव्यावरून आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. महिला लोकप्रतिनिधींनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम केले पाहिजे, असे राजकारणात म्हटले जाते. पुण्यात तुमची वहिनी राज्याचा कारभार अत्यंत सक्षमपणे पेलत आहे. आपल्याच वहिनीवर, आपल्या स्त्रीशक्तीवर असा संशय व्यक्त करणे चुकीचे आहे, असे म्हणत रुपाली ठोंबरे पाटील यांनी सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
इंदिरा गांधींचा दाखला देत टीका
देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत आणि या राज्याचे पालकमंत्रीही आहेत, असे रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या. सुप्रिया सुळे या अजित पवार यांच्या बहीण आहेत, तर सुनेत्रा पवार त्यांच्या वहिनी आहेत. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणारे एकमेव नेते अजित पवार होते आणि तुम्ही त्यांच्या भगिनी आहात, असेही त्या म्हणाल्या. इंदिरा गांधी यांनी महिला असूनही पंतप्रधान म्हणून देश ज्या पद्धतीने चालवला, त्याचा दाखला त्यांनी दिला. ज्या महिलेचा पती जातो, तिला सावरायला अख्खे आयुष्य जाते, असे सांगत त्यांनी म्हटले की, हा केवळ वहिनींचा अवमान नाही, तर स्त्रियांचा अवमान आहे.
रोहित पवारांनाही टोला
तुमचे वैचारिक मतभेद असतील, त्यात आम्हाला पडायचे नाही, असे रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या. दरवेळेस पुरुष लोकप्रतिनिधीच का हवे, असा सवाल त्यांनी केला. महिला सुद्धा सक्षम आहेत, असे त्या म्हणाल्या. तुम्ही २४ तास गृहमंत्री द्या, असे म्हटले असते तर आम्ही सहमत झालो असतो, असेही त्या म्हणाल्या. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोघींनी मिळून अजित पवार यांच्या वारशाप्रमाणे गुन्हेगारी संपवायला पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे. अजित पवार यांची जागा जशी सुनेत्रा वहिनी घेऊ शकत नाहीत, तशी ती जागा रोहित पवार किंवा सुप्रिया सुळेही घेऊ शकत नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांच्या विचारांवर काम केले पाहिजे. अजित पवार हे १००१ टक्के खरे सोने होते, असे त्या म्हणाल्या. सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यासोबत अनेक वर्षे काम केले आहे. मात्र, सुनेत्रा पवार यांच्यावर ही जबाबदारी अचानक आल्यानंतरही त्या अत्यंत प्रभावीपणे आपली भूमिका निभावत आहेत. त्यांना साथ द्या, त्या अजित पवार यांच्या पत्नी आणि पवार घराण्याच्या सून आहेत, असे आवाहन त्यांनी केले.
प्रतिक्रिया व्यक्त करा