, २७ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

इंदू मिल स्मारक २०२७ पर्यंत पूर्ण करा; मुख्यमंत्र्यांचा आदेश

इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं उर्वरित काम गतीने पूर्ण करून ते २०२७ पर्यंत पूर्ण करावं, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

इंदू मिल स्मारक २०२७ पर्यंत पूर्ण करा; मुख्यमंत्र्यांचा आदेश

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचं उर्वरित काम गतीने पूर्ण करून हे स्मारक २०२७ पर्यंत पूर्ण करावं, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यासाठी कंत्राटदाराने सुधारित कामाची कालमर्यादा निश्चित करून उच्चाधिकार समितीकडे तसा अहवाल सादर करावा, असं त्यांनी सांगितलं. तसंच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या कामाच्या प्रगतीवर दररोज नियंत्रण ठेवावं, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

सह्याद्री अतिथिगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्मारकाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी प्रकल्पाची सद्यस्थिती, स्ट्रक्चरल स्टीलचं फॅब्रिकेशन, ब्रॉन्झ क्लॅडिंग, बांधकामाची गुणवत्ता, कंत्राटदाराच्या अतिरिक्त आर्थिक मागण्या आणि काम पूर्ण करण्याच्या कालमर्यादेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही

स्मारकाचं काम अपेक्षित गतीने पूर्ण होत नसल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. कंत्राटातील अटी व शर्तींचं पालन करून काम पूर्ण करणं ही संबंधित कंत्राटदाराची जबाबदारी आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. आर्थिक मागण्यांमुळे काम थांबवणं योग्य नसून, कामातील दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. संबंधित एजन्सीची काम पूर्ण करण्याची क्षमता आणि बांधिलकी तपासून आवश्यकतेनुसार पर्यायी एजन्सी नियुक्त करण्यासह कठोर कारवाईच्या पर्यायांचाही विचार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

आर्थिक दाव्यांची छाननी करून निर्णय

कंत्राटातील तरतुदी, जीएसटी दरातील बदल, दरवाढ निर्देशांक आणि अतिरिक्त कामांमुळे निर्माण झालेल्या खर्चाची तांत्रिक व आर्थिक पडताळणी करावी, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. जीएसटी दरातील बदलाबाबत कंत्राटातील तरतुदींनुसार कायदेशीर अभिप्राय घ्यावा. ब्रॉन्झ क्लॅडिंगसाठी आवश्यक साहित्य खरेदी करता यावं, यासाठी बँक हमीच्या आधारे आगाऊ रक्कम देण्याच्या प्रस्तावाची तपासणी करावी. सर्व आर्थिक प्रस्ताव एकत्रितपणे समितीसमोर ठेवून नियमानुसार निर्णय घ्यावा, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. स्ट्रक्चरल स्टीलची उभारणी आणि ब्रॉन्झ क्लॅडिंगची कामं एकमेकांशी समन्वय साधून समांतरपणे पूर्ण करावीत. आवश्यक साहित्य, यंत्रसामग्री, मनुष्यबळ, फॅब्रिकेशन आणि प्रत्यक्ष बांधकाम यांचा समावेश असलेलं सुधारित वेळापत्रक सादर करावं. प्रत्येक टप्प्याची जबाबदारी आणि कालमर्यादा निश्चित करून त्यानुसार नियमित आढावा घ्यावा, असे निर्देशही देण्यात आले.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance