राज्यातील प्राथमिक शाळांच्या शिक्षकांनी ऑनलाइन आणि अशैक्षणिक कामांच्या वाढत्या ताणाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. १ डिसेंबर २०२६ पासून ऑनलाइन प्रशासकीय कामांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय शिक्षक संघटनांनी घेतला आहे.
या निर्णयासोबतच शिक्षक प्रशासकीय व्हॉट्सअॅप ग्रुपमधून बाहेर पडणार आहेत. शिक्षकांनी डिजिटल असहकार आंदोलन पुकारले आहे. ऑनलाइन कामांमुळे अध्यापनासाठी मिळणारा वेळ कमी होत असल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. रात्री-अपरात्री येणाऱ्या आदेशांमुळे आणि अशैक्षणिक कामांच्या वाढत्या बोजामुळे शिक्षक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे अध्यापनात अडथळा ठरणाऱ्या ऑनलाइन कामांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
पुण्यातील बैठकीत निर्णय
मंगळवारी पुण्यातील शिक्षक भवन येथे राज्यातील विविध शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत एकत्रित लढ्याचा निर्धार करण्यात आला. त्याच बैठकीत डिजिटल असहकार आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. राज्यातील ६४ हजार शाळांमध्ये शिकवणाऱ्या दोन लाखांपेक्षा अधिक शिक्षकांनी हा निर्णय घेतला आहे.
कोणते अॅप्स वापरावे लागतात?
शिक्षकांना विविध शैक्षणिक आणि प्रशासकीय कामांसाठी अनेक अॅप्स वापरावे लागतात. स्विफ्ट चॅट, निपुण महाराष्ट्र, पीएम पोषण, उल्हास, गोट कर्मयोगी, विनोबा आणि स्वयं या अॅप्सचा त्यात समावेश आहे. या सर्व अॅप्सचा वापर शिक्षकांना करावा लागतो, असा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. प्रशासनाकडून व्हॉट्सअॅप ग्रुपवर रात्री-अपरात्री सूचना आणि आदेश पाठवले जातात. त्यामुळे शिक्षकांवरील मानसिक ताण प्रचंड वाढला असून त्याचा परिणाम अध्यापनावर होत असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा